मुंबई : पावसाळ्यात समुद्रात उठावं त्यांच्यापेक्षाही मोठं राजकीय वादळ आज राज्याच्या राजकारणात उठलंय. कारण शिवसेनेचे (Shivsena) इतकी वर्षे निष्ठावंत असणारे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच संपर्काच्या बाहेर गेल्या शिवसेना नेत्यांचे धाबे दणाणले. तसेच ठाकरे सरकारवरही (Cm Uddhav Thackeray) संकटाचे ढग दिसू लागले. आता प्रत्येक घडली नवी माहिती नवे दावे समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये आहेत. त्यांच्यासोबत पस्तीस आमदार असल्याचा दावा हा गुजरातमधील भाजप नेत्यांनी केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमचा सर्व आमदारांशी संपर्क झाल्याचा आणि एकनाथ शिंदे यांच्याशीही संपर्क झाल्याचा दावा केलाय. तर शिवसेना आमदारांबाबत बोलताना संजय राऊत अजूनही मन मानायला तयार नाही की असं काही होईल, असे म्हणतानाही दिसून आले.
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, ज्या क्षणी आमचा आमदारांशी संपर्क होईल त्या क्षणी ते परत येतील. आमच्यासोबत त्यांना लढावं लागेल. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आमच्याशी लढावं लागेल. एकनाथ शिंदे कालपर्यंत मुंबईत होते. ते शिवसेनेच्या विजयासाठी प्रयत्न करत होते. ते आमचे जीवाभावाचे सहकारी आहेत. कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहे. ज्या पद्धतीने बोललं जातंय ते वाईट आहे. माझं त्यांच्याशी बोलणं झाल्याशिवाय मी बोलणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले. तसेच आमदारांशीही संपर्क झाला आहे. अत्यंत वाईट काळात शिवसेनेसोबत राहिलेले हे सर्व नेते आहे. त्यांच्या मनात कधीही सेना सोडण्याचा विचार नाही आला. आत्ताही असा विचार आला असेल तर मी मानायला तयार नाही, असेही संजय राऊत म्हणताना दिसून आले.
तर केंद्र सरकार कसं काम करतंय हे सर्वांना माहिती आहे. चान्स मिळाला की आमचे सर्व आमदार परत येतील. पवार साहबे आणि उद्धवजी यांच्याशी बोलणं सुरू आहे. सर्व लवकरच ठीक होईल. या किंगमेकरांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. गुजरातमध्ये त्यांना कसं अडवलं आहे. हे सर्व आपण पाहत आहे. केंद्रातून गुजरातमध्ये कसं काम होतं हे माहिती. सात पद्धतीची सुरक्षा त्यांना दिली आहे. मुख्य रस्ते बंद केले आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याची योजना गुजरातमध्ये आखली जाते हे देशाचे दुर्दैव आहे, असे विधानही संजय राऊत यांनी केले आहे. आता राज्याचं राजकारण राऊतांच्या दाव्यानुसार पुन्हा स्थिर होणार की आणखी अस्थिर होणार हेही येणारे काही तासच सांगतील.