मंत्रालयात वेगाने हालचाली, जुन्या फायली काढल्या जाताहेत, सरकार जाणार?; नाना पटोले यांचं सूचक वक्तव्य काय?

| Updated on: Mar 18, 2023 | 9:24 AM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. एखादं सरकार जातं तेव्हा जशी मंत्रालयात गडबड असते तशी लगबग सध्या मंत्रालयात दिसत आहे. यावरून काही तरी गडबड असावी. सरकारला काही तरी चाहूल लागली असावी, असं सूचक विधान नाना पटोले यांनी केलं आहे.

मंत्रालयात वेगाने हालचाली, जुन्या फायली काढल्या जाताहेत, सरकार जाणार?; नाना पटोले यांचं सूचक वक्तव्य काय?
Nana Patole
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. तब्बल नऊ महिन्याच्या युक्तिवादानंतर ही सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. हा निकाल कधीही येण्याची शक्यता आहे. मात्र, निकाल कुणाच्या बाजूने लागेल हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. निकाल काहीही येऊ शकत असल्याने निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, याच दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. सरकार जात असताना जशी मंत्रालयात हालचाली सुरू असतात तशीच हालचाल सध्या मंत्रालयात पाहायला मिळत आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार जाणार का? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

नाना पटोले यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना हे मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक ही शेवटची आहे की नाही हे सांगता येणार नाही. कारण जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही. तोपर्यंत त्यावर काही बोलणं योग्य नाही. पण आमचे लोक जे सांगत आहेत ते महत्त्वाचं आहे. मंत्रालयात लगबग वाढली आहे. जुन्या फायली पटापट काढल्या जात आहेत, असं आमचे लोक सांगत आहेत. कदाचित सत्ताधाऱ्यांना काही चाहूल लागली असावी. त्यामुळे मंत्रालयात लगबग सुरू असल्याचा सीन आहे. याचा अर्थ काही ना काही गडबड आहे, असं सूचक विधान नाना पटोले यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

निकालाची वाट पाहतोय

सरकार जेव्हा जातं तेव्हा अशीच लगबग असते. मंत्रालयातील गडबडीवरून मला असं वाटतं. काही तरी गडबड आहे असं निश्चित दिसतं. पण कोर्टाचा निकाल येईपर्यंत मी त्यावर काही भाष्य करणार नाही, असंही ते म्हणाले. कोर्टाचा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात गेला तर काय करणार? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर आमचे ए आणि बी प्लॅन ठरले आहेत. आम्ही निकालाची वाट पाहत आहोत, असं ते म्हणाले.

चवन्ना छाप ट्रोलर्स

विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. सरन्यायाधीशांना ट्रोल केलं जात असल्याने त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. भाजप सत्तापिपासून किती आहे याचा शेवट नाही. अंत नाही. हे चित्र आपण पाहत आहोत. महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू झाला. तेव्हा सुरतपासून गुवाहाटी आणि नंतर गोवापर्यंत काय काय घडलं हे आपण पाहिलं. राज्यपालांनी पदाचा केलेला दुरुपयोगही पाहिला आहे. ट्रोलर ही व्यवस्था त्यांच्याकडे आहे. हे ट्रोलर चवन्नी छाप आहेत. त्यांना पैसे दिले जातात. सरन्यायाधीशांनी सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असताना काही टिप्पणी केली. पण निकाल आपल्या विरोधात जातो की काय अशी भीती वाटल्याने या ट्रोलर्सच्या माध्यमातून सरन्यायाधीशांना ट्रोल केले जात आहे. हे लांच्छनास्पद आहे. त्यामुळे आमच्या खासदारांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.