विनायक डावरुंग, मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : दिवाळीत मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी रात्री उशीरापर्यंत मेट्रो – 7 आणि मेट्रो – 2 ( अ ) च्या अतिरिक्त फेऱ्या चालविण्याची मागणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांना पत्र लिहून केली आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर सहाव्या मार्गिकेचे काम सुरु असल्याने लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे अशा वेळी मेट्रोच्या फेऱ्या रात्री 12 वाजेपर्यंत चालविण्यात आल्या तर मुंबईकरांना दिलासा मिळेल असे त्यांनी पत्रात लिहीले आहे.
दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. मेट्रो रेल्वेचे मेट्रो – 7 आणि मेट्रो – 2 ( अ ) मार्ग पश्चिम उपनगरातील प्रवाशांना उपयोगी पडत आहेत. पश्चिम रेल्वेच्या सहाव्या मार्गिकेचे काम सुरु आहे. त्यामुळे 26 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दुरुस्ती ब्लॉकमुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबईतील पश्चिम उपनगरात मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दिवाळीच्या निमित्ताने सुद्धा 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत प्रवाशांची संख्या वाढणार असल्याने या तारखांदरम्यान मेट्रो रेल्वे फेऱ्यांची वेळ रात्री10 ऐवजी रात्री 12 पर्यंत वाढवावी अशी विनंती पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्राद्वारे एमएमआरडीच्या महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांना केली आहे.
एमएमआरडीएने अलिकडेच नवरात्र उत्सवात विनंतीला मान देऊन मेट्रोच्या फेऱ्यांची संख्या वाढविली होती. त्याचा फायदा पश्चिम उपनगरातील प्रवाशांना खूप फायदा झाला होता. रात्री उशीरापर्यंत मुंबईकरांना मेट्रोने प्रवास करायला मिळाल्याने त्यांची ट्रॅफीक जाम मधून सुटका झाली होती. पश्चिम रेल्वेच्या ब्लॉकमुळे अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्याने 31 ऑक्टोबर रोजी एमएमआरडीएच्या येलो लाईन 2 अ आणि रेड लाईन 7 ने सर्वाधिक 2,50,004 प्रवासी संख्या गाठली होती.