लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकीच्या बळावर मोठा विजय खेचून आणला. राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारली. त्यामुळे यापुढे आघाडीतील घटक पक्ष इतर निवडणुका एकत्रित लढण्याचा अंदाज होता. हा अंदाज पदवीधर मतदारसंघात साफ चुकला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत मिळत आहे. पदवीधर मतदारसंघात घटक पक्षांनी वेगळी चूल मांडल्याचे चित्र दिसत आहे.
काँग्रेसविरुद्ध ठाकरे गट
कोकण पदवीधर मतदार संघांसाठी काँग्रेसचे रमेश किर यांनी उमेदवारी अर्ज भरला असून ठाकरे गटाकडून आज सकाळी 11 वाजता किशोर जैन हे देखील अर्ज भरणार आहेत.विशेष म्हणजे किशोर जैन हे मशाल चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर उल्लेख करण्यात आला आहे. किशोर जैन यांनी कोकण पदवीधर मतदार संघासाठी नोंदणीचे काम ठाकरे गटाकडून हाती घेतलं होतं.पक्ष प्रमुखांकडून कोकण पदवीधर मतदार संघाची जबाबदारी किशोर जैन यांच्या खांद्यावर देण्यात आली होती.
चुरशीची लढत
कोकण पदवीधर मतदार संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून संजय मोरे,भाजप कडून निरंजन डावखरे,राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमित सरय्या रिंगणात उभे आहेत. भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नाशिक शिक्षक मतदार संघात ठाकरे गट लढत असून मुंबई शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ देखील ठाकरे गट लढत आहे.
मनसेच्या माघारीचा फायदा महायुतीला
मनसेकडून कोकण पदवीधर मतदार संघातून माघार घेतल्याने याचा फायदा महायुतीला होणार असल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमित सरय्या हे देखील मैदानात उतरलेले आहेत.शिवसेना शिंदे गटाकडून संजय मोरे यांनी देखील पदवीधर मतदार संघातून अर्ज भरला आहे.कोकण पदवीधर मतदार संघ हा महायुतीचा बालेकिल्ला समजला जातो त्यामुळे यंदा बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनसेच्या दिलजमाईमुळे महायुतीचे पारडे जड मानण्यात येत आहे.