नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर कृषी कायदे रद्द केले आहेत. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे सरकारला झुकावं लागलं. शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. शेतकऱ्यांनी हे स्वातंत्र्य लढून मिळवलं आहे. भिकेत मिळालं नाही, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि अभिनेत्री कंगना रणावतला लगावला.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणाव, दबाव आणि दहशतीखाली होता. त्याचं जोखड आता निघालं आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय असतं? कंगना रणावत सांगते ते स्वातंत्र्य नाही किंवा विक्रम गोखले म्हणतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरचं जोखड निघून जातं, फेकलं जातं. ते स्वातंत्र्य असतं, असा टोला राऊत यांनी लगावला. तीन काळे कायदे रद्द होत आहेत, शेतकऱ्यांसाठी हा स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं. भिकेत मिळवलेलं नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिलं. जालियनबागेत ब्रिटिशांनी आमच्या वीरांना चिरडलं. त्याच पद्धतीने लखीमपूर खेरीतही या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी शेतकऱ्यांना चिरडून मारलं. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने मला आजची सकाळ स्वातंत्र्याची पहाट वाटतेय, असंही ते म्हणाले.
राज्यकर्ते कोणी असो. शेतकरी हा आपल्या शेतीचा मालक नसून गुलाम बनविण्याचा हा कायदा होता. नव्या प्रकारची कार्पोरेट जमीनदारी या देशात लादली जाणार होती. ईस्ट इंडिया कंपनी ज्या पद्धतीने या देशात घुसली आणि राज्य आणि देश पारतंत्र्यात टाकला, त्या पद्धतीने भांडवलदारांना नव्या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करण्यासाठी कायदा बनवला होता. या देशातील शेतकऱ्यांनी एकजुटीने दीड वर्ष लढा दिला. पोलिसांनी गोळीबार केला… मंत्र्यांनी चिरडले. पण पंजाब हरयाणाचा शेतकरी मागे हटला नाही. मोदी सांगत होते तसे हे शेतकरी दोन राज्यांचेच नव्हते. या दोन राज्यातील शेतकरी देशाच्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करत होते. शेवटी सरकारला झुकावं लागलं, असं त्यांनी सांगितलं.
मोदींनी शेतकऱ्यांची माफी मागितली नाही. मोदी हे पंतप्रधान आहेत. अमानुष बहुमताचा गैरवापर करून त्यांनी कायदे आणले. त्यामुळे 700 शेतकऱ्यांना मरणाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली, असं त्यांनी सांगितलं. कायदे रद्द झाले. पण ते सद्भभावनेने रद्द केलेले नाही. शेतकरी मागे हटायला तयार नाही. असंतोष वाढत चालला आहे. 13 राज्याच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपच पराभव झाला आणि उद्याच्या पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निडणुकीत पराभव होईल या भीतीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं.
सुनील शिंदे यांना विधान परिषदेचं तिकीट जाहीर करण्यात आली. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सुनील शिंदे कडवट शिवसैनिक आहेत. रामदास कदम शिवसेनेचे नेते आहेत. तेही कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचं नेतृत्व केलं आहे. सुनील शिंदे हे वरळीचे आमदार होते. आदित्य ठाकरे यांच्यासाठी त्यांनी जागा सोडली. हा त्यांचा त्याग आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या या त्यागाचं आणि निष्ठेचं स्मरण ठेवून त्यांना उमेदवारी दिली, असं त्यांनी सांगितलं.
मात्र, राऊत यांनी कदम यांच्या ऑडिओ क्लिपबाबत बोलण्यास नकार दिला. मी ऑडिओ क्लिपवर बोलणार नाही. कदम यांनी पक्षासाठी काम केलं आहे. अनेक वर्ष आमदार, मंत्री होते. विधानपरिषदेत त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. आम्ही सोबत काम करू. मी काही मार्गदर्शक नाही. आम्ही सर्व नेते आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
कणकवलीतील रिक्षाचालकांचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा; उद्या रिक्षा ठेवणार बंद