चिमुकलीला लघुशंका आल्याने लोकलमधून उतरणं जीवावर, बाप-लेकीला लोकलने उडवलं

| Updated on: Feb 03, 2020 | 10:50 AM

चालत्या लोकलमध्ये चिमुकल्या मुलीला लघुशंका आल्याने, सिग्नल लागल्याचं पाहून खाली उतरलेल्या बापलेकीला लोकलने उडवलं. या भीषण दुर्घटनेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

चिमुकलीला लघुशंका आल्याने लोकलमधून उतरणं जीवावर, बाप-लेकीला लोकलने उडवलं
Follow us on

ठाणे : चालत्या लोकलमध्ये चिमुकल्या मुलीला लघुशंका आल्याने, सिग्नल लागल्याचं पाहून खाली उतरलेल्या बापलेकीला लोकलने (Father daughter killed) उडवलं. या भीषण दुर्घटनेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. कल्याण इथल्या पत्रिपुलाजवळ शनिवारी रात्री ही भीषण दुर्घटना (Father daughter killed) घडली.  लोकल रेल्वेच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. अर्शद खान असं 40 वर्षीय वडिलांचं तर आयशा खान असं दुर्दैवी चिमुकलीचं नाव आहे.

प्रवासादरम्यान आयशाला लघवीला आले होते. त्यादरम्यान कल्याणकडे येणारी लोकल सिग्नल लागल्याने ठाकुर्ली-कल्याणदरम्यान रखडली. आयशाला असह्य झाल्याने आणि सिग्नल लागल्याचं पाहून अर्शद खान यांनी लोकलमधून उतरण्याचा निर्णय घेतला. दोघेही खाली उतरले आणि घात झाला. थांबलेल्या लोकलमधून उतरले मात्र त्याचवेळी कल्याणवरुन सीएसएमटीकडे जाणारी लोकल भरधाव वेगाने आली आणि काही कळण्यापूर्वीच दोघांनाही उडवलं. त्यात बापलेकीचा मृत्यू झाला.

आरबीआयचा फोटो काढून परतताना अपघात

अर्शद खान हे कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरात राहत होते. आयशाच्या शाळेत तिला रिझर्व्ह बँकेबाबत प्रकल्प दिला होता. त्या प्रकल्पाला बँकेचा फोटो हवा होता, तो मिळवण्यासाठी तिने वडिलांकडे हट्ट केला होता. हा फोटो काढण्यासाठी अर्शद खान पत्नी -मुलांना घेऊन मुंबईतील रिझर्व्ह बँकेचा फोटो काढण्यासाठी गेले होते. बँकेचा फोटो काढून रात्री 9.30 च्या लोकलने हे सर्वजण कल्याणकडे निघाले होते. मात्र त्यावेळी आयशाला लघुशंका असह्य झाल्याने, अर्शद यांच्याकडे पर्याय नव्हता. दोघे खाली उतरले मात्र, त्यांच्यावर काळाने घाला घातला.