मुंबई | 20 मार्च 2024 : मुंबई ट्रान्स हार्बर ब्रिज अर्थात ‘अटल सेतू’ चे काही महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटात उद्घाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडल्यावर हा सेतू सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र आता या अटल सेतूवरून उडी मारून एका महिलेने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. किंजल शहा असे या महिलचे नाव असून ती व्यवसायाने डॉक्टर आहे. तिने टॅक्सीतून येऊन अटल सेतूवर उतरून तेथून खाली समुद्रात उडी मारली. किंजल ही महिला गेल्या दहा वर्षांपासून मानसिक तणावात होती. त्याच नैराश्यातून तिने हे कृत्य केले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किंजर शहा ही दादरची रहिवासी असून सोमवारपासून ती बेपत्ता होती. त्यासंदर्भात भोईवाडा पोलिस ठाण्यात शहा यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती.
शहा यांच्या घरी ठेवण्यात आलेली सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागली. त्यात मी अटल सेतूहून आत्महत्या करण्यासाठी जात असल्याचे नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी अधिक तपास केला असता, सीसीटीव्ही फुटेज सापडले. सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास किंजल टॅक्सीत बसली. त्यानंतर पोलिसांनी अटल सेतूवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता २ वाजून १४ मिनिटांनी किंजल हिने अटल सेतूवरून समुद्रात उडी मारल्याचे त्यात दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या १० वर्षांपासून किंजल शहा ही मानसिक तणावत होती. त्याच मनस्थितीतून तिने हे कृत्य केले असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अटल सेतू येथील समुद्रात, मच्छिमारांच्या मदतीने पोलिस शहा यांचा शोध सध्या घेत आहेत.