मुंबई : मुंबईतल्या कांजूरमार्ग येथे सोमवारी रात्री भीषण आग लागली होती. ही आग अवजड औद्योगिक वसाहतीत लागली होती. कांजूरमार्ग पूर्व येथील पोलीस ठाण्याजवळील सॅमसंग कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग विझवण्यासाठी पाण्याचे चार टँकरही पाठवण्यात आले. ही आग रात्री 8.45 वाजता लागल्याची माहिती आहे.
आगीच्या ठिकाणाहून सिलेंडरचा स्फोटाचा आवाज
हे ठिकाण कांजुरमार्गच्या डब्बावाला कंपाऊंड आणि एपेक्स कंपाऊंडजवळ आहे. जवळच निवासी वस्ती आहे. रात्री आगीच्या ठिकाणाहून सिलेंडरचा स्फोट झाल्यासारखा आवाज आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांनंतर रात्री 11.45 च्या सुमारास आग आटोक्यात आली. मात्र, आग पूर्णपणे विझलेली नव्हती. रात्री उशिरापर्यंत कुलिंगचे काम सुरु होते.
आगीचे कारण अस्पष्ट
ऑनलाइन डिलिव्हरीसाठी आलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू येथे ठेवल्या जातात. म्हणजेच ही जागा गोदाम म्हणून वापरली जाते, अशी माहिती आहे. याशिवाय, येथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुरुस्तीसाठी सामान आणले जाते. ही आग का लागली आणि आगीने एवढं भीषण रुप कसं घेतलं, याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही.
We received info around 9 pm that a fire broke out at Samsung Service Centre in Kanjurmarg East, Mumbai due to a short circuit. 10-12 fire tenders are present here. Local people have been shifted. Rescue operations underway: Prashant Kadam, DCP (Zone 7) pic.twitter.com/DccrlCnVed
— ANI (@ANI) November 15, 2021
डीसीपी प्रशांत कदम (झोन-7) यांनी या घटनेबाबत सांगितले की, “कांजूरमार्ग पूर्व सॅमसंग सर्व्हिस सेंटरला रात्री 9 वाजता आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळाली होती. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या येथे आहेत. स्थानिक लोकांना इतरत्र हलवण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे.”
सॅमसंग सेवा केंद्राशिवाय येथे सफोला खाद्यतेलाचे गोदामही आहे. सॅमसंगच्या सर्व्हिंस सेंटरजवळ इतर तीन कंपन्यांचे गोदामही आहेत. यापैकी एक सफोला खाद्यतेलाचे गोदामही आहे. रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत आगीचा मोठा भडका उडत होता, आगीच्या ज्वाळा मोठ्या उंचीवर जाताना दिसत होत्या. आगीचे हे भीषण रुप पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. कांजूरमार्गजवळ एक झोपडपट्टीही आहे. खबरदारी म्हणून झोपडपट्टीत येण्या-जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला होता. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करुन रात्री 11 वाजेपर्यंत परिस्थिती आटोक्यात आणली. आग लवकरात लवकर आटोक्यात आणणे गरजेचे होते. कारण आग लवकर आटोक्यात आली नाही तर ती जवळपासच्या वस्तीत पसरण्याचाही धोका होता.
संबंधित बातम्या :
रायगडमध्ये प्लास्टिकवर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला मोठी आग, पाच तासाच्या प्रयत्नानतंर आगीवर नियत्रंण
VIDEO | कांदिवलीतील हंसा हेरिटेजला भीषण आग, दोन जणांचा मृत्यू