लोकसभा निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर विविध पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. आता उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. 19 एप्रिल ते 1 जून अशा 44 दिवसांच्या प्रदीर्घ काळात एकूण सात टप्प्यात निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आता निवडणूक आयोग कामाला लागला आहे. निवडणूक आयोगाने मुंबईत प्रथमच डॉक्टरांना निवडणूकीच्या कामाला जुंपण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवेवर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
लोकसभा निवडणूकांचा धडाका सुरु झाला आहे. राज्यातील 48 लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे. तर मुंबईतील सहा लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने देशात सात टप्प्यात या निवडणूकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत पाच टप्प्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. आणि 4 जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघात निवडणूक होणार आहे. मुंबई यंदा निवडणूकीच्या कामांसाठी डॉक्टरांना इलेक्शन ड्यूटी लावली आहे. मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, कुपर आणि नायर डेंटल रूग्णालयातील सुमारे 500 डॉक्टरांना इलेक्शन ड्युटी लावली आहे.
मुंबईतील महत्वाच्या आणि रुग्णसेवेचा सर्वाधिक भार असलेल्या केईएम, सायन, कुपर, जीटी, नायर आणि नायर डेंटल रुग्णालयातील डॉक्टरांना इलेक्शन ड्यूटी लावण्यात आली आहे. अगदी नर्सेस पासून ते डीनपर्यंत सर्वांनाच निवडणूकीचे काम दिल्याने रुग्ण सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईतील पालिका रूग्णालयांतील सुमारे 80 टक्के स्टाफ इलेक्शन ड्युटीवर जाणार आहे. निवडणूक कामांतून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून सूट असतानाही देखील अशा प्रकारची इलेक्शन ड्यूटी मुंबईत लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केईएम रूग्णालयातील 900 पैकी 600 नर्सेस इलेक्शन ड्युटीसाठी हजर होण्याचे पत्र आले आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रमुख रूग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प पडण्याची भिती व्यक्त होत आहे.