मिठी नदीतील जैवविविधता वृद्धिंगत?, पवईतील प्रकल्प स्थळाजवळ पुन्हा दिसू लागले मासे

| Updated on: May 27, 2023 | 8:42 PM

या प्रकल्पामुळे प्रकल्प परिसरातील नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारत आहे. यानिमित्ताने बृहन्मुंबई महापालिकेचे प्रयत्न योग्य दिशेने असल्याचे अधोरेखित होत आहे.

मिठी नदीतील जैवविविधता वृद्धिंगत?, पवईतील प्रकल्प स्थळाजवळ पुन्हा दिसू लागले मासे
Follow us on

प्रतिनिधी, मुंबई : मिठी नदीमध्ये काही महिन्यांपूर्वीपर्यंत मासे दिसणे ही एक दुर्मिळ बाब मानली जात होती. त्याच मिठी नदीत काही ठिकाणी आज थोड्याफार प्रमाणात का होईना मासे दिसू लागले आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सकारात्मक बदल प्रत्यक्षात आणणाऱ्या ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ या प्रकल्पाद्वारे मिठी नदीतील काही लाख लिटर पाण्याची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यात आली. ते पाणी पुन्हा मिठी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त मनपा आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे प्रकल्प परिसरातील नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारत आहे. यानिमित्ताने बृहन्मुंबई महापालिकेचे प्रयत्न योग्य दिशेने असल्याचे अधोरेखित होत आहे.

मुंबई नगरीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असणारी मिठी नदी. मुंबईतच उगम पावणाऱ्या आणि मुंबईतच समुद्राला जाऊन मिळणाऱ्या या मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ किलोमीटर एवढी आहे. या नदीचे पाणलोट क्षेत्र हे साधारणपणे ७ हजार २९५ हेक्टर एवढे आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणाऱ्या विहार आणि पवई तलावांमधून होणारा विसर्ग हा या नदीचा प्रमुख जलस्रोत आहे. ही नदी माहीमच्या खाडीतून समुद्राला जाऊन मिळते.

हे सुद्धा वाचा

दोन टप्प्यांमध्ये झाली कामे

मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजीच्या प्रलयकारी पावसानंतर पूरपरिस्थिती हाताळण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाची १९ ऑगस्ट २००५ रोजी स्थापना करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र आणि सत्यशोधन समितीच्या शिफारसींनुसार, दोन टप्प्यांमध्ये मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षण भिंत आणि सेवा रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यातील बहुतांश कामे आता पूर्ण झाली आहेत.

 

नदी भासत होती नाल्याप्रमाणे

कधी एकेकाळी वाहती आणि समृद्ध नदी म्हणून ओळख असणारी ही मिठी कालांतराने घनकचरा, सांडपाणी, अतिक्रमण आदी समस्यांनी ग्रासली गेली. या नदीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सफेद पूल नाला, मरोळ बापट नाला आणि वाकोला नाला असे नाले या मिठी नदीलाच येऊन मिळतात. त्यामुळे ही नदी एका मोठ्या नाल्याप्रमाणेच भासत होती. परंतु, या मिठीला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे.