रत्नागिरी : पुन्हा एकदा संपूर्ण कोकण किनारपट्टीलगतच्या सर्व मच्छीमार बांधवानी एल.ई.डी फिशिंगच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. ऐन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मच्छीमारांनी मतदान न करण्याचा पवित्रा घेतला आहे. राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने जर लवकरात लवकर या अवैध मासेमारीच्या विरोधात कारवाई केली नाही, तर मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंतचा सर्व पारंपरिक मच्छीमार येत्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार आहे, असं तेथील मच्छीमारांनी सांगितले. येत्या दोन दिवसात या विषयावर हर्णै बंदरात महासभा होणार आहे. या महासभेला संपूर्ण किनारपट्टीलगतचा पारंपरिक मच्छिमार बांधव उपस्थित राहणार आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी गुहागरमध्ये हर्णै दाभोळ गुहागर येथील मच्छिमार बांधवानी एक एल इ डी फिशिंग करणारी नौका फिशरीजच्या अधिकाऱ्यांना पकडून दिली. या नौकेवर फिशरीज अधिकाऱ्यांकडून पंचनामा होऊन कारवाई झाली. तरीही अजून शासनाचे डोळे उघडत नाहीत. एल.ई. डी मासेमारीच्या विरोधात संपूर्ण किनारपट्टीला रांनच पेटलं आहे. या मासेमारीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्णपणे बंदी असूनदेखील राजरोसपणे ही मासेमारी चालत आहे. याच्याच विरोधात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पारंपरिक मच्छिमारांनी 26 जानेवारीला या मासेमारी विरोधात उपोषणही केलं होते. या उपोषणात जिल्ह्यातील बहुतांश मच्छिमार सहभागी झाले होते.
एल.ई.डी फिशिंगमूळे संपूर्ण मासळीच समुद्रातून नष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या हर्णै बंदरात मासळीची आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. त्यामुळे एका नौकेवर आठ किंवा चार दिवसांकरिता फिशिंगकरीता लागणारे साहित्य, नोकरवर्ग यांचा लाखो रुपयांचा खर्च नौकामालकाच्या अंगावरच पडत आहे. अशा पद्धतीत सुद्धा बंदरात हजारो नौका आपला उद्योग करत आहेत. यात नौकामालकाचे अक्षरशः कंबरडे मोडत आहे. अशा या कठीण परिस्थितीत पुन्हा या उद्योगात मच्छीमारांना ठामपणे उभे राहणे कठीण होऊन बसले आहे. या एल.ई.डी फिशिंगच्या विरोधात अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, सभा घेऊन संबधित मंत्र्यांपर्यंत निवेदनाद्वारे विषय मांडण्यात आला आहे. तरी देखील काहीच दाद लागत नाही. राजकीय पाठिंबा असल्यामुळेच एल.ई.डी फिशिंग बिनधास्तपणे सुरु आहे. यामुळे सर्व किनारपट्टीलगत असणारा पारंपरिक मच्छिमार मरणार आहे. याला संपूर्ण शासनच जबाबदार राहणार आहे, असा आरोप येथील मच्छीमारांनी केला आहे.
एल.ई.डी फिशिंग मुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ
गेली कित्येक वर्ष एल.ई.डी फिशिंगचा हैदोस समुद्रामध्ये चालला आहे. त्यामुळे समुद्रातील माश्यांचा साठा हळूहळू संपुष्टात येऊ लागला आहे. दिवसेंदिवस हे वाढतच असल्यामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. एल.ई.डी फिशिंगवर कारवाई करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना, अनेक मंत्र्यांना निवेदनाद्वारे गाऱ्हाणे घालुन झाले. परंतु अशा अनेक मागण्या एल.ई.डी फिशिंगच्या विरोधात करून देखील सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. याकडे शासनाने वेळीच लक्ष नाही घेतले, तर येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील नाखवा संघटनेने घेतला आहे. मच्छिमार आता सहन करणार नाहीत आम्ही सर्व कोकण किनारपट्टीलगतचे मच्छिमार यामध्ये सामील आहोत, असे येथील स्थानिक मच्छिमार शैलेंद्र कालेकर यानीं सांगितले.