राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या विविध पथकांचा दिवस-रात्र तपास सुरु आहे. पोलिसांकडून वेगवेगळ्या अँगलने या घटनेचा तपास केला जातोय. यापैकी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित अँगलनेदेखील पोलिसांचा तपास सुरु आहे. पोलिसांकडून तपासाचा धडाका सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी 5 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी पनवेल आणि कर्जत येथून आरोपींना अटक केली आहे. तसेच यापैकी एका आरोपीला डोंबिवली येथून अटक केली आहे. या आरोपींचा बाबा सिद्दीकी यांच्या हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने पोलिसांनी या 5 आरोपींना अटक केली आहे. हे पाचही आरोपी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या गँगच्या संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “मी सध्या काही प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नाहीय. आमच्या बैठका सुरु आहेत. तुम्ही आतादेखील पाहिलं असेल. आमची आताही बैठक चालली. अनेक गोष्टी आहेत. मला माझ्या कुटुंबाचीदेखील सुरक्षा करायची आहे. मला कृपया थोडा वेळ द्या, जेणेकरुन मी माझ्या कुटुंबाला सुरक्षा देऊ शकेन आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी मला करता येतील. आपल्याला उत्तरे जरुर मिळतील. जेव्हा मला उत्तर मिळेल तेव्हा मी आपल्याला उत्तर देईन. आम्हाला न्याय नक्कीच हवा आहे. मला माहिती आहे की, न्याय नक्की मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पोलीस आयुक्त सर्वजण या प्रकरणात काम करत आहेत. आमचा तपास सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया झिशान सिद्दीकी यांनी दिली.
बाबा सिद्दीकी यांच्यावर दसऱ्याच्या दिवशी 12 ऑक्टोबरला रात्री दहा वाजेच्या सुमारास रिक्षातून आलेल्या तीन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हादरलं आहे. महाराष्ट्राची राजधानीत अशाप्रकारे एका माजी मंत्र्याची गोळ्या झाडून हत्या होते हे धक्कादायक आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांचा युद्ध पातळीवर तपास सुरु आहे. पोलिसांनी या प्रकरणी गोळीबारानंतर लगेच दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर जसजसा तपास पुढे गेला तसतसे अनेकांना अटक करण्यात येत आहे.
बाबा सिद्दीकी यांची हत्या का करण्यात आली? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. एसआरए प्रकल्पाच्या वादातून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली का? की अभिनेता सलमान खान याच्यासोबत चांगले संबंध असल्याने बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांची हत्या केली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून वेगवेगळ्या अँगलने तपास केला जातोय. पण या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.