मुंबई : नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर पोलिस दलात परतले आहेत. सशस्त्र पोलीस दलातून वाझे यांची गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली आहे. (Former Encounter Specialist Assistant Police Inspector Sachin Vaze Reinstated in Crime Branch)
“महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 (न) चे पोट कलम (2) आणि त्याखालील सुधारित स्पष्टीकरणानुसार आयुक्त स्तरावरील पोलीस अस्थापना मंडळ यांना अपवादात्मक प्रकरणांमध्ये जनहितार्थ आणि प्रशासनिक निकडीनुसार सक्षम प्राधिकारी म्हणून प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, पोलीस अस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून जनहितार्थ विशेष बाब म्हणून प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात येत आहे” असा उल्लेख बदलीच्या ऑर्डरमध्ये आहे.
कोण आहेत सचिन वाझे?
सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे.
मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले. (Sachin Vaze Reinstated in Crime Branch)
सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर ‘जिंकून हरलेली लढाई’ नावाचे पुस्तक मराठीत लिहिले होते. शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली.
सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेवलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते.
VIDEO : टॉप 9 न्यूज https://t.co/GBFOgQuWE2
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 9, 2020
(Former Encounter Specialist Assistant Police Inspector Sachin Vaze Reinstated in Crime Branch)