मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची (Shivsena Rebel MLA) आणि नाराजीनाट्याची सध्या चर्चा होत असली तरी माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांची नाराजी मात्र गेल्या काही महिन्यांपासूनची आहे. रामदास कदम यांची शिवसेनेवरची ही नाराजी ती लपूनही राहिली नाही. या राजकीय परिस्थितीतच रामदास कदम यांचे सुपुत्र आणि शिवसेना आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) गुवाहाटीची वाट धरत बंडखोर शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे रामदास कदम यांच्या बंडाच्या बातम्याही फिरू लागल्या, त्यानंतर मात्र रामदास कदम यांनी आपण नाराज नसल्याचे सांगत आपण शिवसेनेतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रामदास कदम यांनी ही भूमिका स्पष्ट केली असली तरी त्यांच्या मुलांची भूमिका माहिती नसल्याचे सांगत कदम यांनी मुलांच्या भूमिकांविषयी हात वर केले.
मी पक्षासोबत बेईमानी करणार नाही. मी आजही शिवसेनेसोबत आहे. मी शेवटपर्यंत शिवसेनेतच राहणार आहे. पण मुलांचं माहिती नाही. मुलांना त्यांच्या मतदारसंघात त्रास दिला जातो, हे खरं आहे. त्यामुळे मुलांना जिथे जायचं तिथे जाऊ द्यात, मी मरेपर्यंत शिवसेनेसोबतच राहणार आहे, भगव्याची साथ सोडणार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनावर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यावेळी या बैठकीत एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना तूर्तास अभय देण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही मात्र शिवसेनेच्या बंडखोर आमदारांपैकी 16 जणांना नोटीस देण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्यांना आपली बाजू मांडण्याची मुदत या नोटीसमध्ये देण्यात आली आहे.
शिवसेनेचा आक्रमक नेता म्हणून रामदास कदम यांची ओळख आहे. त्याचबरोबर नारायण राणेंना भिडणारा कोकणातील एक वजनदार नेता अशीही त्यांची ओळख आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. 1990 पासून सलग चार वेळा ते आमदारपदी निवडून आले होते. 2005 मध्ये त्यांची विरोधीपक्ष नेतेपदी वर्णी लागली, त्याचवेळी शिवसेना नेतेपदीही त्यांची निवड करण्यात आली होती. रामदास कद फडणवीस सरकारच्या काळात कॅबिनेटमध्ये त्यांनी पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. तर 2019 मध्ये त्यांचे सुपूत्र योगेश कदम दापोली मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.
मी काल, आज, उद्या शिवसेनेतच..! भाजपामध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही. मुळात तशी गरजही पडणार नाही. राष्ट्रवादी पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी उचललेले हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करणारे आहे. ही परिस्थिती मावळल्यावर दापोली मतदारसंघात शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईन. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका. मी शिवसैनिक! असं ट्वीट योगेश कदम यांनी शुक्रवारी केलं होतं.