मुंबईः महाविकास आघाडी (Mahavikas Agahdi) आणि शिवसेनेतून सुरू असलेली बंडखोरी विधान परिषदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची सूचना मिळूनही हे बंडखोरीचे नाटय् सुरूच आहे. आता उद्या शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेही शिंदे गटात सामील होत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्याबाबत उद्या तीन वाजता पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडून पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडा अशी विनंती करून, त्यानंतर त्यांचा निर्णय ऐकून शिंद गटात सामील होणार असल्याचे विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी सांगितले.
महाविकास आघाडीमुळे आणि काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचे प्रचंड नुकसान झाले असून ही आघाडी अशीच राहिली तर त्यामुळे शिवसेनेचे आणखी नुकसान होणार असल्याचे मतही त्यांनी टीव्ही नाईनशी बोलताना व्यक्त केले.
महाविकास आघाडी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिवसेनेच्या मतदार संघाच्या होणाऱ्या नुकसानीमुळे आपण शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी ते विधान परिषदेच्या सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांसोबत चर्चा करूनच हा शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीमुळे आमच्या मतदार संघाचा विकास झाला नाही तो नाहीच पण त्याच बरोबर होणारे विमानतळ आणि पाणी योजना, बाजार या गोष्टीही मविआमुळे पळविण्यात आल्या. त्यामुळे मविआबरोबर असणे म्हणजे मतदार संघावर अन्याय करण्यासारखे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर या गोष्टी उद्धव ठाकरे यांना सांगितल्यानंतरही त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले नसल्याचे सांगितले.
महाविकास आघाडीमुळे शिवसेना पक्षाला मोठा फटका बसला आहे. शिवसेनेच्या पारंपरिक मतदार संघाचा विकास या मविआमुळे झाला नाही. त्यामुळे शिवसेनेतील कित्येक कार्यकर्ते नाराज आहेत. नाराजीमुळे कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. प्रत्येक शिवसैनिकाला शिवसेना वाचावी, शिवसेनेचे शिलेदार वाचावे अशीच भावना असल्याने आपण शिंद गटात जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमची भूमिका मांडण्यासाठी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपली बाजू सांगण्यासाठी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. या पत्रकार परिषदेत भूमिका मांडून, पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरें यांना महाविकास आघाडीमुळे नुकसान होत असल्याने त्यांना सोडा अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांना पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या धोरणानुसार कामकाज करू असं सांगणार असल्याचेही विजय शिवतारे यांनी सांगितले. ज्या मतदार संघात दोन नंबरच उमेदवार होते, त्यांना जी मतं मिळाली आहेत, त्यांचे नुकसान मविआ मुळे झाल्याचेही त्यांनी सांगितले.