नवी मुंबई : मुसळधार पावसात नवी मुंबईतील पांडवकडा धबधबा (Pandavkada Waterfall) परिसरात फिरायला जाणं चार विद्यार्थिनींच्या अंगलट आलं आहे. धबधब्याच्या पाण्यात चार विद्यार्थिनी वाहून गेल्या असून त्यापैकी तिघींचे मृतदेह हाती लागल्याची माहिती आहे.
खारघरमधील पांडवकडा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांनी फुलून जातो. नेरुळच्या एसएस महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांचा ग्रुप या परिसरात फिरायला आला होता. धबधब्याच्या पाण्यात त्यापैकी चौघी विद्यार्थिनी वाहून गेल्या. त्यापैकी तिघींचा मृतदेह सापडला, तर एका विद्यार्थिनीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पांडवकडा धबधब्याचे पाणी पुढे तीन किमीपर्यंत पसरला असल्याने वाहून गेलेल्या विद्यार्थिनीचा शोध या परिसरात घेतला जात आहे.
कुठे आहे पांडवकडा?
खारघर आणि बेलापूरदरम्यान असलेल्या टेकडीला ‘पांडवकडा’ म्हटलं जातं. पावसाळ्यात पाणी पडून इथे नैसर्गिक धबधबा तयार होतो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड भागातील पर्यटक वीकेंडला इथे हमखास गर्दी करतात. अनेकदा या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटकांचा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत
ऐन पावसात धबधबे, नद्या, धरणावर फिरायला जाणं टाळावं, असं आवाहन वारंवार प्रशासनातर्फे केलं जातं. वाट निसरडी असल्यामुळे अपघाताची शक्यता अधिक असते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत अनेक पर्यटक आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी जाताना दिसतात.
पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा भारत हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे.