वसई: मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया येथे ओळख आहे आणि त्यांच्या मार्फत नालासोपारा येथील नरसिंग दुबे चॅरिटेबल ट्रस्ट मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकल (Medical College Admission) फिल्डला प्रवेश मिळवून देतो असे सांगून बारावीच्या विद्यार्थ्याची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला वसईतून अटक (BJP Leader Arrest) करण्यात आली आहे. सुधांशू जगदंबा चौबे (वय 32 )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा वसईचा राहणारा असून तो भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. सुधांशू चौबेला अटक केल्यानंतर त्याच्याकडून आणखी काही फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. मेडिकल कॉलेजला प्रवेश घेऊन देतो असं सांगून त्याने अनेक विद्यार्थ्यांकडून पैसे (Admission Fee) घेतल्याचे समजले असून 62 लाखापेक्षाही अधिक रक्कम त्याने अनेक जणांकडून घेतले असल्याचे पोलिसांनी सांगतले.
मेडिकल कॉलेजच्या नावाखाली डुप्लिकेट इमेल आयडी बनवून मेडिकल कॉलेजसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना संपर्क साधून मी तुम्हाला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देतो म्हणून संपर्क साधता होता.
मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देतो असं सांगून जय विजय पाटील या 20 वर्षाच्या मुलाला आपल्या जाळ्यात फसवून त्याच्याकडून त्याने 11 लाख रुपये घेतले होते. त्याच्याकडून लाखो रुपये घेतल्यानंतरही आणि विद्यार्थ्याने चौकशी करुनही प्रवेश मिळाला नसल्याने त्यानंतर विद्यार्थ्याने पोलिसांशी संपर्क साधला.
पैसे दिले पण प्रवेश होत नसल्यामुळेमुळे आपली आर्थिक फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यावर जय पाटील यांनी प्रथम माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. फसवणूक करणाऱ्यावर माणिकपूर पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
या आरोपीने आतापर्यंत 62 लाख 12 हजार 820 रुपयांची विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या आरोपीने आणखी कुणाची फसवणूक केली असेल तर तात्काळ माणिकपूर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे अहवानही वसई विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी केले आहे.