‘त्या’ निकालावर संशय?, गजानन कीर्तिकर यांचा थेट आरोप काय?; मुख्यमंत्र्यांना टेन्शन?

| Updated on: Jun 20, 2024 | 4:09 PM

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावर शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मोठं भाष्य केलं आहे. या मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रियेत काही संशयास्पद गोष्टी होत्या, असा दावा कीर्तिकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

त्या निकालावर संशय?, गजानन कीर्तिकर यांचा थेट आरोप काय?; मुख्यमंत्र्यांना टेन्शन?
gajanan kirtikar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबतची अजूनही चर्चा सुरू आहे. या मतदारसंघात झालेल्या फेरमतमोजणीत शिंदे गटाचे रवींद्र वायकर विजयी झाले. तर ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर पराभूत झाले. अमोल यांचा अत्यंत थोडक्या मतांनी पराभव झाला. त्यामुळे ठाकरे गटाकडून ईव्हीएम मशीन आणि निवडणूक अधिकाऱ्याच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. ठाकरे गटाने या प्रकरणी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच या निकालावरून ठाकरे गटाला फटकारलं होतं. मात्र, त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी आपल्याच पक्षाच्या खासदाराच्या विजयावर संशय व्यक्त करणारं विधान केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गजानन कीर्तिकर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा संशय व्यक्त केला. मतमोजणी प्रक्रियेत काही गोष्टी संशयास्पद होत्या. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात कलेक्टरने वंदना सूर्यवंशी यांना आरो म्हणून नेमलं. वंदना सूर्यवंशी यांची पार्श्वभूमी काय? त्या संशयास्पद व्यक्ती आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्याकडून ही संशयास्पद कृती झाली आहे. त्याबद्दल त्यांना कोर्टात सफाई द्यावी लागेल, असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे.

कलेक्टरची मोठी चूक

लोकसभा निवडणुकीत आरो नेमताना निवडणूक आयोगाने कलेक्टरला काही निकष दिले आहेत. पण इथल्या कलेक्टरने वंदना सूर्यवंशी या भ्रष्ट अधिकाऱ्याला आरो म्हणून नेमलं ही कलेक्टरची मोठी चूक आहे. आता निवडणूक आयोगाकडे त्यांना दाद द्यावी लागेल, असं सांगतानाच कोर्टाचा निर्णय आला तर स्वीकारावाच लागतो. आम्ही तो स्वीकारू, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.

विधानसभा लढणार नाही

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. रामदास कदम यांच्या मनातल्या विचारांवर मला बोलायचं नाही. मी एकनाथ शिंदेंसोबत आहे. विधानसभेला सामोरे जाणार आहे. निवडणूक प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहे. पण मी विधानसभेची निवडणूक लढणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तेव्हाच विचार सोडले

शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन झाला. मी 58 वर्षापासून शिवसेनेत आहे. मी पक्षात नाराज नाही. काँग्रेससोबत शिवसेनेचा प्रवास सुरू झाला तेव्हाच त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. आता त्यांच्याकडून नैतिकतेचे धडे घ्यायचे का?, असा सवाल करतानाच मला कुणाचाही फोन आलेला नाही. त्यांनी काय आक्षेप घेतले यावर मी सविस्तर बोलणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.