पश्चिम रेल्वेकडून कोकणात गणपतीसाठी विशेष ट्रेन, पण कासव वेगाने की, पृथ्वीला प्रदक्षिणा घालून, कारण घेणार एवढा वेळ

| Updated on: Jul 26, 2023 | 7:02 PM

मध्य आणि पश्चिम रेल्वेने काेकणात यंदा गणपतीसाठी सोडलेल्या गाड्यांची संख्या आता 266 इतकी झाली आहे. यंदा गणपती उत्सव 19 सप्टेंबर रोजी असल्याने दोन दिवस आधी जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण केव्हाच फुल झाले आहे. आता पश्चिम रेल्वे जादा गाड्या सोडल्या, पण...

पश्चिम रेल्वेकडून कोकणात गणपतीसाठी विशेष ट्रेन, पण कासव वेगाने की, पृथ्वीला प्रदक्षिणा घालून, कारण घेणार एवढा वेळ
KONKAN
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 26 जुलै 2023 : कोकणी माणूस मुंबईत कुठेही कामाला असला तरी त्याला गणपतीच्या सणाला गावी कोकणात जाण्याचे नियोजन वर्षभरापूर्वीच ठरलेले असते. यंदा गणपतीचा सण 19 सप्टेंबर रोजी असल्यामुळे दोन दिवस आधीच कोकणात पोहचण्याची चाकरमान्यांना घाई असते. कारण गावी जाऊन घराची साफ सफाई करायची असते. त्यामुळे 17 आणि 18 सप्टेंबरच्या सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण केव्हाच फुल झाले आहे. मध्य रेल्वेने आधी 156 नंतर 52 अशा 208 विशेष गाड्या सोडल्या पण त्याची तिकीटे लागलीच फुल झाली. त्यानंतर पश्चिम रेल्वेने व्हाया वसई मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड अशा 30 गाड्या सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्यांना चाकरमान्यांना आशा होती. परंतू तिचे वेळापत्रक पाहता ती कोकणात पोहचेपर्यंत गणपतीची प्रतिष्ठापना पूर्ण होईल अशी परिस्थिती आहे.

मध्य रेल्वेने यंदा गणेशोत्सवासाठी यंदा सर्वप्रथम 24 जून रोजी 156 स्पेशल ट्रेन सोडल्या होत्या. या गाड्यांचे बुकींग 27 जूनच्या सकाळी आठ वाजून काही मिनिटांत फुल्ल झाले. त्यानंतर 1 जुलै रोजी मध्य रेल्वेने दिवा आणि चिपळून दरम्यान 36 मेमू आणि मुंबई आणि मंगळुरु दरम्यान 16 स्पेशल ट्रेन अशा 52 गणपती स्पेशल सोडल्या. त्यानंतर मध्य रेल्वेने पुन्हा 18 अनारक्षित ( 9 डाऊन आणि 9 अप ) ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेने काेकण मार्गावर यंदा गणपतीसाठी सोडलेल्या गाड्यांची संख्या आता 266 इतकी झाली आहे.

तब्बल पंधरा तासांचा प्रवास

पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड एकूण 30 गाड्या सोडल्या आहेत. त्यातील उधणा ते मडगांव सहा साप्ताहिक स्पेशल ट्रेनचाही समावेश आहे. ट्रेन क्र. 09009 मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड स्पेशल ही ट्रेन मंगळवार वगळून 14 ते 30 सप्टेंबर 2023 या काळात  मुंबई सेंट्रलहून दु.12 वा.सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वा. सावंतवाडी रोडला तब्बल 15 तासांच्या कालावधीने पोहचणार आहे. परतीची ट्रेन क्र.09010 सावंतवाडी रोड वरुन ( बुधवार वगळून ) पहाटे 5 वाजता सुटून त्याच दिवशी सायं. 8.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहचणार आहे. त्यामुळे ट्रेन जर वेळेवर धावली तर पंधरा तास अन्यथा आणखी एक तास जादा असा कोण प्रवास करणार ? असा सवाल डोंबिवलीचे प्रवासी बळीराम राणे यांनी केला आहे.