कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला अखेर सापडला, मुंबई पोलिसांना मोठं यश

| Updated on: Jan 09, 2020 | 1:11 PM

मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक, कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावालाला (Gangster Ejaz Lakdawala arrested ) मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावाला अखेर सापडला, मुंबई पोलिसांना मोठं यश
Follow us on

मुंबई : मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक, कुख्यात गॅंगस्टर एजाज लकडावालाला (Gangster Ejaz Lakdawala arrested ) मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. बिहारच्या पाटण्यातून एजाज लकडावालाला पकडण्यात आलं. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं असता, कोर्टाने त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Gangster Ejaz Lakdawala arrested )

एजाज लकडावालाच्या मुलीला काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर अटक केली होती. ती बोगस पासपोर्टवर देश सोडून जात होती. तिला अटक केल्यानंतर तिच्याकडे केलेल्या तपासात एजाज लकडावालाची माहिती उघड झाली होती. त्याद्वारे एजाज लकडावाला याचा माग काढून पोलिसांनी त्याला पाटणा येथून अटक केली.

एजाज लकडावालावर जवळपास 25 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. एजाज लकडावाला हा दाऊदचा अत्यंत जवळचा सहकारी होता. मात्र दाऊदसोबतच्या वादानंतर तो गँगस्टर छोटा राजनच्या टोळीत गेला होता. मुंबईत झालेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये लकडावालाचा सहभाग होता. वर्ष 2003 मध्ये एजाज लकडावालाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र तो बँकॉकवरुन कॅनडाला पळून गेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो तिथेच होता. लकडावालाने छोटा राजनशी हातमिळवणी केल्याने दाऊद नाराज असल्याची चर्चा होती.


दरम्यान, यापूर्वी पोलिसांनी लकडावालाची मुलगी सोनिया लकडावाला उर्फ सोनिया शेखला शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावरुन अटक केली होती. सोनिया बनावट पासपोर्टच्या आधारे नेपाळला जाण्याच्या तयारीत होती. त्यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन एजाज लकडावालाची माहिती मिळवली.

एजाज हा छोटा राजन गॅंगमध्ये होता. त्यापूर्वी तो दाऊद गॅंगमध्ये होता. छोटा राजनवर हल्ला झाल्यानंतर तो छोट राजन गॅंगमधून वेगळा झाला होता. त्याच्याविरोधात 27 गुन्हे दाखल आहेत.शिवाय सुमारे 80 तक्रारी आहेत. देशाच्या विविध राज्यातही लकडावालाविरोधात गुन्हे दाखल आहेत.

मुंबई पोलीस अनेक महिन्यांपासून शोध घेत होते. त्याच्या मुलीला 28 डिसेंबर रोजी अटक केली होती. ती  सोनिया मनीष अडवाणी या बोगस नावाने पासपोर्ट बनवून नेपाळला निघाली होती.  त्यावेळी तिला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. त्याच्या मुलीला अटक केल्यावर पोलिसांना एजाज लकडावालाविरोधात अनेक माहिती मिळाली.

एजाज लकडावाला हा 8 जानेवारी 2020 रोजी बिहारमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  त्यानुसार पोलिसांनी तयारी केली होती. पोलिसांनी बिहारमधीळ पाटण्यातील जनकपूर इथे लकडावालाला अलगद पकडला. काल रात्री त्याला मुंबईत आणून अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.