“निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी…”, गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज, भक्तांचे डोळे पाणावले

| Updated on: Sep 17, 2024 | 2:19 PM

'पुढच्या वर्षी लवकर या' असे साकडे घालत गणरायाला निरोप दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज, भक्तांचे डोळे पाणावले
Follow us on

Ganpati Visarjan 2024 : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असा जयजयकार करत ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. मुंबईतील लालबाग-परळमध्ये सध्या गणेश भक्तांचा महापूर आल्याचे पाहायला मिळत आहे. तर पुण्यातही गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. गेले दहा दिवस मोठ्या भक्तीभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेशभक्तांचे डोळे आज पाणावले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला निरोप दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या महाउत्सवाची आज सांगता होणार आहे. सध्या लालबागमध्ये मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच लालबागमध्ये सध्या पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा आणि सेवा केल्यावर आज त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे. सध्या लालबागमधील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. जगभरात ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या राजेशाही मिरवणुकीला लवकरच सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे मुंबईचा राजा अशी ओळख असलेला गणेशगल्लीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

मुंबईतील अनेक गणपतींची विसर्जन मिरवणूक तब्बल 24 तास चालते. बाप्पाचं मोहक रुप पाहण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची गर्दी होऊ लागली आहे. अनेक गणपती बाप्पांची उत्तरपूजा सकाळी पार पडली. त्यानंतर आरती करत विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. तेजुकाया मंडळाच्या बाप्पााच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ढोल-ताशांचा गजरात, गुलाल उधळत बाप्पाला निरोप दिला जात आहे. तेजूकाया बापाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यावर मुंबईतील इतर गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.

पुण्यातील मानाचे गणपती मार्गस्थ

मुंबईसह पुण्यातही मोठ्या थाटात गणपती विसर्जन हा पारंपारिक आणि मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. प्रभात बँड पथकाच्या वादनात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या ही विसर्जन मिरवणूक बेलबाग चौकात पोहोचली आहे. तर दुसरीकडे मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. पारंपरिक पालखीतून तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पाचे विसर्जन पार पडणार आहे. यावेळी विष्णू नाद शंख पथकाकडून करण्यात शंखनाद करण्यात आला. न्यू गंधर्व बँडच्या वादनात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

नाशिकमध्ये विसर्जन मिरवणुकींवर सीसीटीव्हींची नजर

गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहे. नाशिक महापालिकेकडून 56 ठिकाणी कृत्रिम तलावाची उभारणी करण्यात आली आहे. नाशिकमध्ये सकाळी 11 वाजता विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे. तब्बल 21 सार्वजनिक मंडळांचा या मिरवणुकीत सहभाग असणार आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावर 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. तर 50 ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून मिरवणुकीवर नजर ठेवली जाणार आहे. नियम भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

नांदेडमध्ये प्रशासन सज्ज

तर नांदेडमध्ये आज लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. 2 हजार 900 पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. तसेच 3 कृत्रिम तलाव, 26 मूर्ती संकलन केंद्र ही सज्ज आहेत. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भक्तांसह नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

नंदुरबारमधील पहिला मानाचा दादा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

तसेच नंदुरबारमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. 200 पेक्षा अधिक गणरायाच्या आज विसर्जन होणार आहे. कोणताही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. नंदुरबारमधील पहिला मानाचा दादा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो.