Mumbai Ghatkopar Crane Collapsed : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघात घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला परिसरात बेस्ट बसचा अपघात झाला. यात ७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ४० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. त्यातच आता दुसरीकडे पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपरमध्ये क्रेन कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. यामुळे ठाण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील पंत नगर परिसरात एक क्रेन कोसळली आहे. यामुळे घाटकोपरवरुन ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच पूर्व द्रुतगती मार्गावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ही क्रेन कोसळल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. या दुर्घटनेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे सध्या घाटकोपरवरुन ठाण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.
तर दुसरीकडे जळगावच्या धरणगावात चोपडा रोडवरील पिंपळे फाट्याजवळ एस. टी. बसचा भीषण अपघात झाला आहे. एका धावत्या एस. टी. बसने उभ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 1 ठार आणि २१ प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे. ही अपघातग्रस्त झालेली बस जळगावहून धरणगाव- चोपडा मार्गे शिरपूरकडे जात असल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच बस चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. या बसने ट्रॅक्टरला दिलेली धडक इतकी जबरदस्त होती की या अपघातात बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलिलांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.
यासंदर्भात अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. तसेच अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रवाशांच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केल्याचे दिसून येत आहे.