मुंबईला हादरवून सोडणाऱ्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना यश आलं आहे. भावेश भिंडे हा दुर्घटना झाल्यापासून फरार होता. पोलीस त्याचा प्रचंड शोध घेत होते. भावेशच्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने घाटकोपरमध्ये छेडानगर परिसरात पेट्रोल पंपच्या बाजूला अनधिकृत भव्य मोठं होर्डिंग उभारलं होतं. हे होर्डिंग 120×120 आकाराचं आवाढव्य होतं. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेची कोणतीही परवानगी या होर्डिंगसाठी घेण्यात आली नव्हती. तरीही ते उभारण्यात आलं होतं. या आवाढव्य होर्डिंगचं वजन जास्त असल्याने दोन दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग जमिनीच्या दिशेला झुकलं आणि थेट बाजूला असलेल्या पेट्रोल पंपावर कोसळलं. त्यामुळे मोठा हाहा:कार उडाला. या दुर्घटनेत जवळपास 120 पेक्षा जास्त नागरीक ढिगाऱ्याखाली दबले होते.
अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफची टीम आणि पोलिसांनी ढिगाऱ्याखालून 85 जखमींना बाहेर काढलं. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला. तसेच मोठमोठ्या गाड्यांचं नुकसान झालं. 66 पेक्षा जास्त रुग्णांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर होर्डिंग लावणाऱ्या कंपनीचा मालक भावेश भिंडेचा पोलीस शोध घेत होते. पण तो फरार होता. पण अखेर तो पोलिसांच्या हाती लागला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. होर्डिंग दुर्घटनेच्या घटनेपासून भावेश भिंडे हा फरार होता. पोलीस गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उदयपूर येथून भावेश भिंडेला अटक केली आहे. भावेश भिंडेला आता पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबईत आणलं जाणार आहे. भावेश भिंडेने भाच्याच्या नावाने उदयपूरमध्ये हॉटेल रूम बुक केली होती तिथे तो राहत होता.
होर्डिंग दुर्धघटनेच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. तर या घटनेला दोषी ठरणाऱ्या आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर भावेश भिंडे याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल झाला होता.
भावेश भिंडे याच्या विरोधात जानेवारी महिन्यात मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्याच्यावर कोर्टात आरोपपत्र देखील दाखल झालंय. भावेश भिंडे 2009 मध्ये मुलुंड येथून आमदारकीला उभा राहीला होता. त्यावेळी त्याने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याच्यावर 23 गुन्हे दाखल झाल्याची माहीती दिली होती. भावेश भिंडे याच्यावर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन अॅक्ट आणि नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टचा चेक बाऊन्सिंग झाल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच होर्डींग्ज बसविताना पालिका आणि रेल्वेचे नियम पायदळी तुडविल्याचे अनेक गुन्हे भिंडे याच्यावर दाखल झालेले आहेत. तसेच झाडांना विष घालून मारल्याचा गुन्हा देखील मुंबई महानगर पालिकेने त्याच्यावर दाखल केला आहे.