मुंबई : शिवसेनेचे जिंकणे हे आता स्वप्नच बनून राहणार आहे. शिवसेनेची (Shivsena) अवस्था काय झाली आहे, ते आपण बघत आहोत. त्यांनी हाताने आणि स्वत:हून अशी परिस्थिती ओढवून घेतली आहे. त्यामुळे आता दौरे करून काय मिळणार, तसेच स्वत:च स्वत:च्या पेपरमध्ये लिहून आणून काय होणार, असा सवाल गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी विचारला आहे. ते मुंबईत बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख लवकरच राज्यभर दौरा करणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मागील काही दिवसांपासून शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरे करत आहेत. त्यास प्रतिसादही मिळत आहे. मात्र या दौऱ्यावर भाजपा तसेच शिंदे गटाच्या नेत्यांनी पहिल्यापासूनच टीका केली आहे. गिरीष महाजन यांनी यावर टोला लगावला आहे.
पंकजा मुंडे नाराज आहेत हे सगळे कपोकल्पित आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांचे मनाचेच मांडे सुरू आहेत, अशी टीका गिरीष महाजन यांनी राष्ट्रवादीवर केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका जाहीर कार्यक्रमात पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. त्यावर भाजपाचे नेते गिरीष महाजन यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. ते म्हणाले, की पंकजा ताईंसमोर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी प्रस्ताव ठेवला आहे, त्याचा काही परिणाम होणार नाही. सध्या सर्व पक्षांची राज्यात काय परिस्थिती आहे, असा सवाल गिरीष महाजन यांनी केला आहे. राष्ट्रवादी असो की शिवसेना, कुणाच्याही ऑफरचा काहीही फरक आम्हाला पडणार नाही, असे ते म्हणाले. आमच्यात कोणतेही अंतर्गत वाद नाहीत, असा दावादेखील त्यांनी यावेळी केला.
हॉकीचे जादुगर कर्नल ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण खेलदिवस म्हणून साजरा करतो. कालची मॅच पाहिली नाही पण भारताने मॅच जिंकली, हे खेलदिनाचे गिफ्ट असल्याचे गिरीष महाजन म्हणाले. यानिमित्ताने हार-जित, मॅच यावरून त्यांनी शिवसेनेला टोले लगावले. राज्यात आता किती पक्ष उरले आहेत, त्यांची अवस्था काय झाली आहे, असा सवालच त्यांनी विचारला आहे. आदित्य ठाकरे यांनी दौरे आता काढले, मात्र आधीच काढले असते तर ही वेळ आली नसती, असे शिंदे गटाच्या आमदारांचे मत आहे. भाजपानेदेखील या दौऱ्यांवर टीका केली आहे. शिवसेनेने ही अवस्था स्वत:हून ओढवून घेतल्याची टीका त्यांनी केली आहे.