मुंबई : मुंबई लोकलच्या (Mumbai Local Accident) गर्दीने आणखी एका प्रवाशाचा जीव घेतला आहे. भरगच्च लोकलमधून पडल्याने एका 22 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला (Dombivli Girl Death). चार्मी पासद (Charmi Pasad) असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान आज सकाळी 9 च्या सुमारास ही दुर्घटना घडली (Dombivli Girl Death).
चार्मी पासदने डोंबिवलीवरुन सकाळी 8.53 ची लोकल पकडली होती. मात्र गर्दीमुळे आत जाता न आल्यामुळे, ती बाहेरच लटकून राहिली. ट्रेन डोंबवलीच्या पुढे गेल्यानंतर, डोंबिवली आणि कोपर रेल्वेस्थानकादरम्यान, चार्मीचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. या दुर्घटनेमध्ये तिचा अंत झाला.
डोंबिवली स्टेशन हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचं स्टेशन आहे. सकाळी या स्टेशनवरुन लोकल पकडणे हे अत्यंत जीवघेणं काम ठरत आहे. सकाळी लोकल इतक्या भरलेल्या असतात की डोंबिवलीमध्ये लोकल पकडणं अशक्य होतं. त्यामुळे अनेकांना लटकून, जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या जीवघेण्या प्रवासाने अनेकांचे बळी घेतले आहेत.