आनंद पांडे, टीव्ही9 मराठी, मुंबई: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख करुन, तिचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या 44 वर्षीय आरोपीला घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. हेतलकुमार हसमुखलाल मोदी असं आरोपीचं नाव असून, तो गुजरातमधील बडोद्यातील दांडिया बाजार इथला रहिवासी आहे.
आरोपी हेतलकुमार मोदी हा दुबईत एका खासगी कंपनीत ड्रायव्हर आहे. वर्षभरापूर्वी रेल्वेत त्याची ओळख संबंधित मुलीशी झाली होती. त्यावेळी बारावीत शिकणारी घाटकोपरमधील ही मुलगी, भांडणामुळे एकटीच आपल्या चंदीगड येथील गावी रेल्वेने निघाली होती. त्यावेळी हेतलकुमारने ती एकटीच असल्याचं पाहून, बोरिवली रेल्वे स्टेशनपासून तिच्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला. तिचा मोबाईल नंबर मिळवून तिच्या संपर्कात राहू लागला.
काही दिवसाने आरोपीने तिला फेसबुकवरुन त्रास देण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर तिच्या अश्लील फोटोंची मागणी सुरु केली. जर फोटो दिले नाहीस, तर फेसबुकवर आपले प्रेम प्रकरण आहे असे जाहीर करुन बदनामी करण्याची धमकी देत राहिला.
या भीतीने मुलीने काही फोटो पाठविले असता, आरोपी तिला आणखी त्रास देऊन लागला. या बाबतची माहिती पीडित मुलीच्या भावाला कळली, तेव्हा त्याने पीडित मुलीला आरोपीशी बोलणे बंद करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने तिच्या भावाचे आणि तिचे फोटो एकत्रित करुन त्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली.
या पीडित मुलीने आरोपीशी बोलणे बंद करून फेसबुकवर त्याला ब्लॉक केले. तेव्हा आरोपीने पीडित मुलीच्या नावाने फेसबुकवर खोटे अकाऊंट काढून, त्यावरुन अश्लील मेसेज तिच्या मित्रांना करण्यास सुरुवात केली. तसेच तिचे अश्लील फोटो देखील व्हायरल केले.
ही घटना पीडित मुलीच्या मित्रांनी तिला सांगितली असता, पीडित मुलीने घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुबईमध्ये नोकरीस असलेल्या आरोपीला पकडणे फार कठीण काम होते. परंतु काही दिवसापूर्वी तो भारतात आला आणि त्याने पीडित मुलीला फोन करून भेटायला गुजरातमध्ये येण्यास सांगितले.
पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे, आरोपी गुजरातच्या वडोदरामध्ये असल्याची माहिती काढली. त्याठिकाणी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या.