मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, गुंदवली ते बीकेसी बेस्टची प्रिमियम एसी बस धावणार

| Updated on: Apr 21, 2023 | 5:55 PM

गुंदवली ते बीकेसी या प्रवासासाठी बेस्टच्या प्रिमियम एसी बसला सुमारे रू.60 ते रू.90 इतके भाडे आकारले जात आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना बेस्टच्या 'चलो ॲप'चा वापर करून तिकीट बुक करावे लागेल.

मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, गुंदवली ते बीकेसी बेस्टची प्रिमियम एसी बस धावणार
METRO-BEST
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : मुंबई मेट्रो 7 आणि 2 अ असे मुंबई मेट्रोचे दोन्ही टप्पे यावर्षी 19 जानेवारी 2023 पासून सुरू झाल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मुंबई महा मेट्रोने नुकताच सुमारे 2 कोटी प्रवासी संख्येचा टप्पा पार केला आहे. मुंबई महा मेट्रोचा पहिला टप्पा 2 एप्रिल 2022 रोजी सुरू झाला होता. सध्या मेट्रोची रोजची प्रवासी संख्या 1.6 लाख झाली आहे. आता मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या समन्वयाने बेस्ट मार्फत गुंदवली मेट्रो स्थानक ते बीकेसी अशी प्रिमियम एसी बस सेवा सुरू केली आहे, त्यामुळे मुंबई मेट्रोच्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई महा मेट्रोचा पहिला टप्पा 2 एप्रिल 2022 रोजी सुरू झाला होता. त्यानंतर 19 जानेवारीपासून दोन्ही टप्पे कार्यरत झाल्याने पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा लाभ झाला आहे. दुसरा टप्पा लागू झाल्यानंतर रोजची प्रवासी संख्या आता 1.6 लाख झाली आहे. महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाच्या समन्वयाने बेस्ट मार्फत गुंदवली मेट्रो स्थानक ते बीकेसी अशी प्रिमियम एसी बस सेवा सुरू केली आहे, त्यामुळे मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे.

असे आहे प्रिमियम बसचे वेळापत्रक

बेस्ट ची बस क्र. एस – 112 ही बस गुंदवली मेट्रो स्थानक ते बीकेसी आणि बीकेसी ते गुंदवली या मार्गावर चालवली जात असून या मार्गा दरम्यान एकूण 21 थांबे आहेत. गुंदवली ते बीकेसी या मार्गावर सकाळी 7:30 वाजल्यापासून 11:40 वाजेपर्यंत 16 फेऱ्या, तर बीकेसी ते गुंदवली या मार्गावर दुपारी 3:40 वाजल्यापासून पासून रात्री 8:15 वाजेपर्यंत 13 अशा एकूण 29 फेऱ्या चालवत आहे. गुंदवली ते बीकेसी या प्रवासादरम्यान प्रवाशांच्या गंतव्य स्थानकापर्यंत सुमारे रू.60 ते रू.90 इतके भाडे आकारले जात आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना बेस्टच्या ‘चलो ॲप’चा वापर करून तिकीट बुक करावे लागेल अशी माहीती सूत्रांनी दिली आहे. अर्थात ही सेवा प्रिमियम असून थोडी महागडी आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठीही बेस्टने येथून जादा फेऱ्या सोडण्याची मागणी होत आहे.

असे आहेत थांबे 

गुंदवली मेट्रो स्थानक ते बीकेसी बस क्र. एस-112 चे डाऊन मार्गाचे थांबे पुढील प्रमाणे आहेत. दर्पण सिनेमा किंवा साई सर्व्हीस, बहार सिनेमा, हनुमान रोड, डोमेस्टीक एअरपोर्ट जंक्शन, टीचर कॉलनी, खेरवाडी जंक्शन, कलानगर, फॅमिली कोर्ट, रिझर्व्ह बॅंक, इन्कम टॅक्स कार्यालय, टाटा कॉलनी, भारत नगर, एमएमआरडीए ओपन कार पार्क, बॅंक ऑफ बडोदा, इंडीयन ऑईल ऑफिस, ओएनजीसी ऑफिस बेकेसी, स्क्रिसेन्जो, सिटी बॅंक, डायमंड मार्केट, बीडीबी गेट 11, आयसीआयसीआय बॅंक