मुंबई : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवरील पंधरा डब्याच्या लोकलच्या सहा फेऱ्या येत्या सोमवार 27 मार्चपासून वाढविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दीतून सुटका होण्यास दिलासा मिळणार आहे. या निर्णयाने पंधरा डब्याच्या संख्येत वाढ होणार असली तरी एकूण फेऱ्यांत वाढ न करता सध्याच्या वेळापत्रकातील सहा 12 डब्यांच्या फेऱ्यांना 15 डब्यांत कनर्व्हट करण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पंधरा डब्याच्या गाड्यांची संख्येत वाढ करणार आहे. सोमवार दि. 27 मार्चपासून पश्चिम रेल्वेवर 12 डब्यांच्या सहा लोकल 15 डब्यांच्या म्हणून चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गर्दीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दोन दिशांना तीन-तीन फेऱ्या अशा अप आणि डाऊन मिळून सहा पंधरा डबा लोकल लोकल चालविण्यात येणार आहेत. या सहा फेऱ्यापैकी दोन फेऱ्या फास्ट लाईनवर तर उर्वरीत धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. येत्या 27 मार्चपासून वेळापत्रकात हा बदल होईल असे पश्चिम रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
बारा डब्याच्या सहा फेऱ्यांना पंधरा डब्यांत रूपांतरीत केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गर्दीतून त्यांना अधिक मोकळेपणाने प्रवास करता येणार आहे. या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेच्या एकूण पंधरा डब्यांच्या फेऱ्यांची संख्या सोमवारपासून 144 वरून 150 इतकी होणार आहे. परंतू एकूण फेऱ्यांच्या संख्या मात्र कायम रहाणार आहे. पश्चिम रेल्वेवर सध्या दररोज 1383 लोकलच्या फेऱ्या चालविण्यात येत असून 79 वातानुकूलित लोकल चालविण्यात येत आहेत.
प्रवासी क्षमतेत 25 टक्क्यांची वाढ
12 डब्यांच्या सहा फेऱ्यांना 15 डब्यांमध्ये रूपांतरीत केल्याने प्रत्येक लोकलच्या प्रवासी वाहन करण्याच्या क्षमतेत 25 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी सूमित ठाकूर यांनी म्हटले आहे.