मुंबई: संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (msrtc employees) कामावर रुजू होऊ द्या. ते कामावर आल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश देणारे एसटी महामंडळाचे एक गोपनीय पत्रं उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी या पत्राची होळी केली. तसेच एसटी महामंडळाच्या विलीनिकरणाच्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाचीही होळी करण्यात आली आहे. या गोपनीय पत्रामुळे सरकारचा चेहरा उघड झाला आहे. हे सरकार दुटप्पी आहे. त्यांना कामगारांचा छळ करून एसटीत पैसे घेऊन त्यांच्या लोकांना भरती करायचे आहे. अधिवेशनात आम्ही त्यावर आवाज उठवणार आहोत, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. गोपीचंद पडळकर यांनी या पत्रं आणि अहवालाची होळी केल्यानंतर मीडियाशी संवाद साधला.
कामगारांना कामावर हजर राहू द्या, हजर झाल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, असं अधिकाऱ्यांना आदेश देणारे गोपनीयतेचं पत्रं आम्हाला उशिरा मिळालं. या पत्राची आम्ही चिरफाड करणार आहोत. माधव काळेंच्या सहीने पत्रं दिलं आहे. एकदा एसटी सुरळीत झाली की कारवाई करा, असं त्यात म्हटलं आहे. सरकार दुटप्पी आहे. त्यांचा दुतोंडीपणा उघड करणार आहोत, असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. हे गोपनीयतेचं पत्रं आणि त्रिसदस्यीय समितीचा अहवाल कामगार विरोधी आहे. त्याची आम्ही होळी केली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवारांच्या शब्दाला काडीची किंमत नाही. मागे ते वीज कनेक्शनवर बोलत होते. मी असेपर्यंत वीज कापली जाणार नाही, असं ते म्हणाले होते. त्यानंतर तीन दिवसात ऊर्जा मंत्र्याने बिल भरायला सांगितलं. त्यामुळे अजित पवारांनी आता मोठेपणा करायचं बंद करावं. माधव काळे हे एसटीतील सचिन वाझे आहेत. ते पत्र पाठवतात. अजितदादांनी ते वाचलं नाही का? असा सवालही त्यांनी केला.
न्यायालयाने राष्ट्रवादीच्या एसटीतील संघटनेची मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे शरद पवार व्हायबल झाले आहेत. म्हणूनच त्यांना कर्मचाऱ्यांना उद्ध्वस्त करायचं आहे. त्यांचं शोषण करायचं आहे. आणि एसटीत त्यांची लोकं पैसे घेऊन भरायची आहेत. आम्ही हे षडयंत्र उघड करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. हे पत्रं चुकीचं असल्याचं महामंडळाकडून सांगितलं जात आहे, याकडे पडळकर यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर हे गोपनीय पत्रं आहे. ते बाहेर पडणार नाही असं त्यांना वाटत होतं. पण ते बाहेर आलं. त्यामुळे अधिकारी उघडे पडले आहेत. चुकीचं पत्रक आहे तर ते बाहेर कसं आलं. संबंधितांवर कारवाई का केली नाही? असा सवालही त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
मालेगाव महापालिकेचे प्रताप; पोलीस मैदानाच्या सरकारी जागेची इदगाह ट्रस्टला खिरापत