मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार हे बहुजनांचं सरकार आहे, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केलं होतं. त्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. जनाब संजय राऊत, महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार आहे असा भयानक फसवा दावा आपण आपल्या पुण्यातल्या सभेत केला. कदाचित आम्हा बहुजनांना आपण पण आपल्या सारखेच शकुनी काकाचे हुजरे समजत असाल. तुमच्या प्रस्थापितांच्या सरकारमध्ये 135 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का?, असा सवाल गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून ही टीका केली आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी राज्यात ब्राह्मण मुख्यमंत्री झालेला पाहायचं आहे, असं विधान केलं होतं. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दानवे यांच्या या विधानावर राऊत यांनी राज्यातील आघाडीचं सरकार बहुजनांचं आहे असं म्हटलं होतं. त्यावर पडळकरांनी पलटवार केलाय.
गेल्या दोन वर्षात एक हजाराच्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते बहुजन नव्हते का? शेतात पीकं असताना शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून वीज तोडणी केली. ते शेतकरी बहुजन नाहीत का? आघाडी सरकारमधील प्रस्थापित नेत्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळं एसी, एसटी, भटके विमुक्त कर्मचाऱ्यांचं पदोन्नतीमधील आरक्षण मातीत घालवलं गेलं, ते कोणत्या तुमच्या बहुजन प्रेमातून आलं होतं? धनगर आरक्षणासंबंधी एक साधी बैठकही तुम्ही अडीच वर्षात करू शकला नाहीत. हे तुमचं कोणत बहुजन धोरणं होतं?, अशी प्रश्नांची सरबत्तीही गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर केली.
सरकार स्थापनेच्या वेळेस तुम्ही प्रस्थापितांसोबत सुप्रीम कोर्टाच्या दिल्ली वाऱ्या करून तातडीने सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. पण जेव्हा आम्हा बहुजनांच्या राजकीय आरक्षणाची वेळ येते त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे तीन तीन निर्णय आमच्या विरोधात येतात. कारण कोर्टानं सांगून सुद्धा तुम्ही अडीच वर्षापासून साधा इंपिरिकल डेटाही तयार केला नव्हता. मुळात तुमची इच्छा हिच आहे की बहुजन पोरांनी तुमच्या सारख्याच प्रस्थापितांच्या सतरंज्याच उचलायच्या, अशी टीकाही त्यांनी केली.
बहुजनांचं दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या वारीतून तुम्ही वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवता. हे बहुजन समाज विसरलेला नाही. आपल्या बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबाडांचा तुम्ही रोज सकाळी उठून उदोउदो करता. हे बहुजनांचे हीत कुठे आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही. कारण त्या करिता स्वाभिमान असावा लागतो, असा टोलाही त्यांनी लगावला.