मुंबई : राज्यातून कोरोना हद्दपार झाल्याची परिस्थिती असताना एक चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. राज्यात गोवर आजाराचा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत असल्याने आरोग्य विभागाची धाकधूक वाढलीय. विशेष म्हणजे गोवरचा संसर्गाचा वेग पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील या आजाराच्या संसर्गाची दखल घ्यावी लागलीय. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरात आतापर्यंत तब्बल 8 रुग्णांचा गोवरमुळे मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.
राज्यात आतापर्यंत गोवरचे 1259 संशयित रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 164 रुग्णांचं निदान झालंय. मुंबईत 8 रुग्णांचा गोवरने मृत्यू झालाय. त्यापैकी एका बालकाने गोवरची लस घेतली होती. इतरांच्या लसीची नोंद नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय.
आरोग्य विभागाचं राज्यातील संवेदनशील भागावर विशेष लक्ष आहे. गोवर लस न घेतलेल्या 5 ते 9 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय.
गोवरचा वाढता प्रादूर्भाव पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गोवर संदर्भात आरोग्य विभागाची बैठक घेतली. गोवरचा होत असलेल्या प्रसारासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लसीकरण करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी लहान मुलांना लवकरात लवकर गोवरची लस देण्याचे आदेश दिले. तसेच मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीविषयाची माहिती जाणून घेतली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी मुंबईच्या कस्तूरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गोबरच्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून कस्तूरबा रुग्णालयाला भेट दिली.
“राज्यात 164 रुग्ण आहेत. त्यापैकी कस्तूरबा रुग्णालयात 74 रुग्णांवर उपचार घेत आहेत. अनेक रुग्णांची प्रकृती बरी आहे. एक-दोन रुग्ण आयसीयूत आहेत. बाकी बालकांची प्रकृती चांगली आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
लस न घेतलेल्या मुलांचं प्रमाण मोठं आहे. 258 पैकी फक्त 50 बालकांनी लस घेतलीय. मुंबई महापालिकेकडून लसीकरण सुरुय. हे प्रमाण वाढवलं जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.