राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्या प्रकरणी पुण्यातून प्रवीण लोणकरला अटक केली आहे. २८ वर्षीय लोणकरचा पोलीस शोध घेत होते. बाबा सिद्धिकींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर संशयित शुभम लोणकर याने एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. लॉरेन्स बिष्णोई गँगने ही हत्या केल्याचा दावा त्याने पोस्टमधून केला. त्यानंतर पोलिसांनी लोणकर भावांचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर २८ वर्षीय प्रवीण लोणकर याला पुण्यात अटक करण्यात आली. पोलिसांनी प्रवीण लोणकरला आज कोर्टात हजर केलं. यावेळी सरकारी वकिलांनी कोर्टात आज पहिल्यांदाच बिश्नोई गँगचा उल्लेख केला.
आरोपी प्रवीण लोणकर आणि शुभम दोन्ही भाऊ बिश्नोई गँगशी सबंधित असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलं. आरोपी शुभम लोणकर सध्या फरार आहे. त्याच्याविरोधात याआधी आर्म्स एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे. शुभम लोणकर कुठे आहे हा त्याचा भाऊच सांगू शकतो, म्हणून त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. यावेळी सरकारी वकिलांनी आरोपी प्रवीण लोणकरला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी केली.
यावेळी आरोपीच्या वकीलांनी सुद्धा युक्तिवाद केला. “काहीही झालं तरी पोलीस नेहमी शुभम लोणकरच्या भावालाच ताब्यात घेतात आणि चौकशी करतात. या प्रकरणातही प्रवीण लोणकरला घरातून ताब्यात घेतलं. आरोपी प्रवीण लोणकरचा यामध्ये सक्रिय सहभाग नाहीय. तो दुधाची डेअरी चालवणारा सामान्य माणूस आहे. शुभम लोणकर याला अटक करण्याऐवजी प्रवीण लोणकर याला सातत्याने ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाते”, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी यावेळी केला.
सरकारी वकिलांनी आरोपीची 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. तर आरोपींच्या वकिलांनी कमीत कमी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. आरोपी प्रवीण लोणकरला या गुन्ह्यात चुकीच्या पद्धतीने गोवलं जात असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण ऐकून घेतल्यानंतर कोर्टाकडून पोलीस कोठडीबाबत निर्णय जाहीर करण्यात आला. कोर्टाने प्रवीण लोणकर याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.