मुंबई: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यपालांनी दोनदा पत्रं पाठवलं होतं. त्यामुळे आज आम्ही त्यांना भेटून निवडणुकीची माहिती देणार आहोत. त्यावर राज्यपालांनी आता निर्णय घेतला पाहिजे. सरकार वेगळं आहे म्हणून ते विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रोखणार नाहीत अशी आशा आहे, असं राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केलं. महाविकास आघाडीचे नेते संध्याकाळी राज्यपालांना भेटणार आहेत. अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत आघाडीने बदल केला आहे. त्यामुळे राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच महाविकास आघाडीने दबाव तंत्राचा वापर सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली. विधानसभेचे अध्यक्षपद एक वर्षापासून रिक्त आहे. कोरोना संकटामुळे उशीर झाला आहे. लोकसभेत ज्या पद्धतीने अध्यक्षाची निवड होते, तीच पद्धत आम्ही अवलंबली आहे. लोकसभेत आवाजी मतदानाने निवडणूक होते. राज्यात 1960पासून अध्यक्ष निवडीचा एकच नियम होता. आम्ही हा नियम बदलला आहे. लोकसभेलाच आम्ही फॉलो करत आहोत. राज्यपाल त्याला मान्यता देतील अशी आशा आहे. राज्यपालांनीच विधानसभेच्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी आग्रह धरला होता. त्यांनी दोनदा मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं होतं. त्यामुळे सरकार वेगळं आहे म्हणून राज्यपाल अध्यक्षपदाची निवड रोखणार नाहीत अशी आशा आहे, असा टोला थोरात यांनी लगावला. आम्ही राज्यपालांना आज भेटणार आहोत. या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे असतील असं ते म्हणाले.
विधानसभा अध्यक्षाच्या निवडीसाठी समितीने नियमात काही बदल केले आहेत. विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच हे बदल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. सर्व गोष्टी नियमानुसार केल्या आहेत. आता फक्त राज्यपालांनी त्याला मान्यता देण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्यपालांना भेटल्यावर विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीबाबतही त्यांना विनंती करणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
विधानसभेच्या अध्यक्षपदी कोण बसणार? या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी देणे टाळले. काँग्रेसकडून विधानसभेच्या अध्यक्षाची घोषणा उद्या होईलच, स्वत: सोनिया गांधी याबाबतचा निर्णय घेणार आहेत. मीडियातील चर्चा आम्हीही पाहतो. मात्र निर्णय दिल्लीतील पक्षातील नेते घेतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या हत्येचा कट होता असा दावा केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्याच्या पोलीस दलाने पडळकर यांना सुरक्षा दिली आहे. पडळकरांनी ही सुरक्षा घेतली पाहिजे. पोलिसा़वर अविश्वास दाखवने चुकीचे आहे, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
Video : अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य महिलेकडे, कोण आहे ही रणरागिणी? वाचा सविस्तर