मोठी बातमी! शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर, महाराष्ट्रातील वादावर चर्चा होणार?

| Updated on: Nov 22, 2022 | 4:57 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानावरुन राज्याच्या राजकारणात हलकल्लोळ माजलेला असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

मोठी बातमी! शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यपाल दिल्ली दौऱ्यावर, महाराष्ट्रातील वादावर चर्चा होणार?
Follow us on

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य करुन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वाद ओढवून घेतला. त्यांच्या विधानामुळे राज्यभरातील शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. विशेष म्हणजे राज्यातील भाजपचे बडे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: कोश्यारी यांच्या विधानाशी आपण सहमत नसल्याचं सांगत राज्यपालांना घरचा आहेर दिलाय. जोपर्यंत सूर्य, चंद्र आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्शच राहतील, असं विधान फडणवीसांनी केलंय. राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गटानेदेखील त्यांना घरचा आहेर दिलाय. राज्यपालांना पदावरुन पायउतार करा, अशी मागणी आता विरोधकांकडून जोर धरु लागलीय. त्यांच्या वादग्रस्त विधानावरुन राज्याच्या राजकारणात हलकल्लोळ माजलेला असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भगतसिंह कोश्यारी दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यपाल येत्या 24 आणि 25 नोव्हेंबरला दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे उत्तर भारतात नियोजित कार्यक्रम आहेत. त्यामुळे ते दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान, राज्यपालांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. कारण राज्यपालांनी चार दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील त्यांनी अशाप्रकारचं विधान केलंय. त्यामुळे त्यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल दिल्लीलीत भाजपचे वरिष्ठ नेते त्यांची कानउघाडणी करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले होते?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी डीलिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील”, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.