मुंबईः महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन छेडून सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला होता. त्यावेळी एस महामंडळाचे विलिनीकरणाचा मुद्या आणि पगारवाढ यासारख्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारला आणि शरद पवार यांच्या घरावरही आंदोलक चालून गेले होते. त्यामुळे आता नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकार तरी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्न सोडवले जाणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना गुणरत्न सदावर्ते, सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन छेडून मविआला जेरीस आणले होते. त्यामुळे आता या एसटी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनीही आता या तीन नेत्यांना सवाल करण्यात येत आहे.
त्यासंदर्भात आज गुणरत्न सदावर्ते यांच्याबरोबर संवाद साधताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर विश्वास व्यक्त करत एसटी कर्मचाऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वासही सदावर्ते यांनी व्यक्त केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याविषयी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांवर ठपका ठेऊन आणि ठाकरे सरकारच्या काळात कोणत्याही तरतूदी करुन ठेवल्या गेल्या नसल्यानेच आजची परिस्थिती आली असल्याचे मत सदावर्ते यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर विश्वास व्यक्त करत एसटी कर्मचाऱ्यांसाठी हे सरकार योग्य ते निर्णय घेईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भातीही त्यांनी माहिती दिली.तर सांगली एसटी कर्मचारी आत्महत्याप्रकरणी फायनन्स डिपार्टमेंटचे सेक्रेटरी मनोज सोनिक व महामंडळांमधील गायकवाड नावाचे अधिकारी या दोघांची चौकशी लावणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढण्यास ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे सरकार यांनी या अगोदर यासंदर्भातील कोणत्याही तरतुदी करून ठेवल्या नव्हत्या असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर ठपका ठेवला आहे.
तसेच काही मोजके अधिकारी शरद पवार यांच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यांच्या कारभारामुळेच कष्टऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ते येणाऱ्या काळात आम्ही सिद्धही करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
तर हे शिंदे-फडणवीस सरकार पगारही देईल, जुनी पेन्शनही देईल आणि सातवा वेतन लागू करील याची आम्हाला शाश्वती असल्याचेही गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या मांडत त्यांनी महाविकास आघाडीवरही जोरदार निशाणा साधला. 124 कष्टकऱ्यांचे मृत्यू झाले होते तेव्हा काँग्रेस आणि शरद पवार झोपले होते का? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.
तुमच्या मर्जीतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून तुम्ही लोकांचे जीव घेत आहात असा ठपकाही त्यानी महाविकास आघाडीतील नेत्यांवर त्यांनी केला आहे.
हे सरकार विचारशील असल्याने हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना कधीही उघड्यावर सोडणार नाही. मात्र मर्जीतील अधिकाऱ्यांमुळे हे सगळं घडत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.