मुंबई : मागच्या तीन दिवसांपासून मुंबईत पाऊस कोसळतोय. मुंबईमध्ये ढगाळ हवामान आहे. अधून-मधून पावसाच्या मुसळधार सरी कोसळतायत. त्यामुळे मुंबईच्या वेगाला ब्रेक लागतोय. पावसाचा रेल्वे सेवेवर परिणाम जाणवू लागलाय. आज सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वडाळा रेल्वे स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
हार्बर मार्गावर लोकल काही मिनिट उशिराने धावत आहेत. त्यामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल होत आहेत. रेल्वेच्या टाइम टेबलवर परिणाम झाल्याने हार्बर रेल्वेच्या मार्गावरील स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे.
रेल्वे सेवा कोलमडण्याइतपत परिणाम नाही
पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा रेल्वे सेवेवर परिणाम होतो. परिणामी कामावर जाणाऱ्या किंवा कामावरुन निघालेल्या प्रवाशांचे हाल होतात. पहिल्या तीन दिवसात अजूनतरी रेल्वे सेवा कोलमडण्याइतपत पावसाचा परिणाम दिसून आलेला नाही.
काही मिनिटांचा विलंब महाग पडतो
पण रेल्वे स्थानकात पाणी साचल्यास तसच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यास रेल्वेच वेळापत्रक कोलमडत. परिणामी प्रवाशांचे हाल होतात. मुंबईत लोकलकडे जीवनवाहिनी म्हणून पाहिलं जातं. दररोज 70 लाखापेक्षा जास्त लोक मुंबईत लोकलने प्रवास करतात. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांसाठी लोकल खूप महत्वाची आहे. अगदी काही मिनिटांच्या विलंबामुळे पुढच्टया ठरवलेल्या सगळ्या कामांची घडी विस्कटते.