मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणाऱ्या कथित मनोविकृताने त्यांना त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानाच्या दूरध्वनी क्रमांकावर दिवाळीत शंभर कॉल केल्याचे उघडकीस आले आहे. तसेच हा इसम दर दिवसाला 15 ते 16 वेळा कॉल करून शिवीगाळ करीत असल्याचे उघडकीस आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना फोन करणारी व्यक्ती विकृत आहे की त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे याचा तपास पोलीसांनी करायचा असल्याचे म्हटले आहे. ही व्यक्ती परराज्यातील असून ग्रामीण शैलीत हिंदी बोलते. आणि विशेष म्हणजे ही व्यक्ती स्वत:च्या मोबाईल फोनवरून कॉल करीत असते.
या वेडसर व्यक्तीचे दिवसाकाठी 15 ते 20 फोन येत असून अत्यंत शिवराळ भाषेत ही व्यक्ती बोलते. या प्रकरणी गावदेवी पोलीस तसेच सह पोलीस आयुक्त गुन्हे यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलीसांनी या व्यक्तीचा पत्ता आणि नावही शोधून काढले होते. चौकशीअंती हा इसम वेडसर असल्याचे उघडकीस आले होते. तो उत्तरेकडील राज्यातील असल्याचेही स्पष्ठ झाले होते.
पवारांना दररोज कॉल करून त्रास देणाऱ्या या कथित वेडसर इसमाच्या कृतीला पायबंद घातला जात नसून दिवसेंदिवस तो अधिकच त्रास देत आहे. दिवाळीच्या दरम्यान त्याने 100 वेळा कॉल करून परिसीमा गाठली होती. हा इसम वेडसर असल्याने पुरेसी कारवाई होत नसल्याचे समजते. परंतू त्यामुळे खासदार शरद पवार यांना होणारा त्रास काही थांबत नाही. त्यामुळे पवारांच्या सचिवांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र लिहून या इसमावर परिणामकारक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.