पुणे : आज येणार उद्या येणार म्हणता म्हणता प्रचंड वाट पाहायला लावणारा मान्सून विदर्भ मराठवाड्यात दाखल झाला आहे. मराठवाड्यातील जालना, लासलगाव, अमरावती, चाळीसगाव, पुणे, सांगली, नागपूर यांसारख्या परिसरात पावसाने बरसायला सुरुवात केली. दरम्यान अवघ्या दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळसह किनारपट्टी परिसरात मान्सून दाखल झाला. येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
राज्यात सध्या भीषण दुष्काळ पडला आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. मात्र दुष्काळग्रस्त मराठवाड्यासह इतर ठिकाणी आज पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आणि दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा मिळाला. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामालाही सुरुवात केली आहे.
राज्यात मराठवाड्यातील जालना, लासलगाव, अमरावती, चाळीसगाव, पुणे, सांगली, नागपूर या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर वर्धा जिल्ह्यासह समुद्रपूर, गिरड, हिंगणघाट, पुलंगाव, देवळी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. यामुळे शहरात काही ठिकाणी रस्ते तुंबले होते. तसेच काही नागरिकांच्या घरातही पाणी शिरले. त्याशिवाय नाशिकमधील मालेगाव शहरातही मान्सूनचे जोरदार आगमन झाले. तसेच साताऱ्यातील कराड, सांगलीतील मिरज याठिकाणीही दमदार सरी कोसळल्या.
उशिरा दाखल झालेला मान्सून मराठवाडा विदर्भात बरसत असला तरी मुंबई शहर किंवा उपनगरात गेल्या आठवड्याभरापासून पावसाच्या सरी कोसळलेल्या नाहीत. यामुळे उकाड्यापासून नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्येही दिवसेंदिवस पाण्याचा साठा कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचाही सामना करावा लागत आहे.
महत्त्वाचं म्हणजे 22 ते 27 जून म्हणजेच पाच दिवसात राज्यात तब्बल शंभर टक्के पाऊस पडेल. विशेषत: पुण्यात या पाच-सहा दिवसात चांगला पाऊस पडेल. धरणातील पाणी साठा वाढू शकतो, असाही अंदाज आहे.
संबंधित बातम्या :
जालन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान