विशाल सिंह, ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई : दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या भ्याड हल्ल्याला 26 नोव्हेंबर रोजी दहा वर्षे पूर्ण होतील. या हल्ल्यातील आठवणी आजही ताज्या आहेत. मुंबईची सागरी सुरक्षा असो, किंवा त्या हल्ल्यात मोलाची भूमिका निभावणारे जिगरबाज अधिकारी असो, या विविध रुपाने 26/11 हल्ल्याच्या आठवणी कायम ताज्या असतात. या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा भ्याड हल्ल्याच्या आठवणी ताज्या होतात आणि त्यानिमित्ताने काही प्रश्नही उभे राहतात.
मुंबईत 26/11 चा हल्ला करणारा दहशतवादी अजमल कसाब आणि त्याचा साथीदार अबु इस्माईल हे दोघे स्कोडा कारने गिरगाव चौपाटीच्या दिशेने जात होते. पोलीस कंट्रोल रुमने दहशतवादी गिरगावच्या दिशेने येत असल्याची माहिती दिली. यानंतर कसाब आणि त्याच्या साथीदाराने नाकेबंदीमुळे यूटर्न घेण्याचा प्रयत्न केला. पण गाडी दुभाजकावर चढली. यावेळी झालेल्या गोळीबारात तुकाराम ओंबाळे शहीद झाले. याचवेळी कसाबला जिवंत पकडण्यात आलं. कसाबला जिवंत पकडणारे पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर सध्या सीएसएमटी स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक असून संपूर्ण स्टेशनच्या सुरक्षेची धुरा ते सांभाळत आहेत.
सागरी मार्गाची सुरक्षा अजूनही अधांतरी?
मुंबईमध्ये अतिरेकी कसाब आणि त्याचे साथीदार हे सागरी मार्गानेच घुसले होते आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या नरसंहार अख्ख्या जगाने उघड्या डोळ्याने पाहिला. मात्र दहा वर्षांनंतरही मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी जे काही बंदोबस्त केले गेले, त्यात भारी उणिवा असल्याचं समोर आलंय. त्यामुळे भविष्यात 26/11 सारखी दुर्घटना झाली, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चिंताही व्यक्त केली जातेय.
26/11 च्या हल्ल्यानंतर मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी मोठा गाजावाजा केला गेला. केंद्र सरकारतर्फे सागरी सुरक्षेसाठी 23 नवीन सागरी बोट मुंबई पोलिसांना देण्यात आल्या. त्यापूर्वी नऊ बोटी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात होत्या. पण टीव्ही 9 च्या हाती जी महिती लागलीय, ती पाहून तुम्हाला धक्का बसेल. कारण, 32 बोटींपैकी जवळपास 16 सागरी बोटी या मुंबई पोलीस नौका विभाग, लकडा बदर, दारूखाना, माझगाव या ठिकाणी असलेल्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी पडून आहेत.
एवढंच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक चिंतेची बाब म्हणजे, सागरी सुरक्षेसाठी एकूण 464 लोकांचा स्टाफ आहे. पण त्यापैकी फक्त 172 कर्मचारी आहेत. उर्वरित जागा रिक्त असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मुंबईत सागरी सुरक्षा रामभरोसे
एकूण 32 पैकी जवळपास 16 बोटी नादुरुत आहेत. दारूखानाच्या पोलीस गॅरेजमध्ये दुरुस्ती सुरु आहे. जवळपास 50 टक्के सागरी बोटी नादुरुस्त आहेत. सागरी सुरक्षेत एकूण 464 अधिकारी कर्मचारी आहेत. फक्त 172 चा ताफा कार्यरत असून 229 जागा रिकाम्या आहेत.