मुंबई | 27 जुलै 2023 : दक्षिण मुंबईत सहसा पावसाळ्यात कधी पाणी साचत नाही हा आजवरचा अनेक वर्षांचा शिरस्ता. परंतू गुरुवारी चक्क चर्चगेट रेल्वे स्थानकाचे रुळ पाण्याखाली गेले. त्यामुळे या ऐतिहासिक स्थानकात इतक्या वर्षांनी प्रथमच पावसाचे पाणी साचल्याचे दृश्य होते. इतक्या वर्षांनी थेट चर्चगेट ते मरीनलाईन स्थानकात पाणी साचण्यामागे कोस्टल रोडसाठी केलेला समुद्रातील भराव जबाबदार असल्याचे म्हटले जात होते. परंतू पालिकेने तातडीने याबाबत खुलासा करीत नेमके कारण सांगितले.
मुंबईत किती पाऊस कोसळला तरी ब्रिटीशांनी वसवलेल्या दक्षिण मुंबईत कधी पावसाने पुर आला आहे. असे दृश्य दिसत नाही. परंतू गुरुवारी हवामान विभागाने जोरदार पर्जन्यवृष्टीचा दिलेल्या इशाऱ्यानंतर चक्क चर्चगेट स्थानकात पाणी साचल्याचे फोटो समाजमाध्यमात व्हायरल होऊ लागले. यासाठी कोस्टल रोडच्या बांधकामासाठी समुद्रात टाकलेला भराव किंवा अंडरग्राऊंड मेट्रोचे काम जबाबदार असल्याचे म्हटले जात होते.
हे ट्वीट पाहा –
#Maharashtra | Slight waterlogging witnessed on the railway tracks between Churchgate – Marine Lines railway station. However, train movement is smooth. pic.twitter.com/Xh1nb7NnK2
— Tv9 Gujarati (@tv9gujarati) July 27, 2023
दक्षिण मुंबईमध्ये पावसाबरोबरच जोरदार लाटांसोबत वाहून आलेले लहान आकाराचे खडक पाटण जैन मार्गाच्या पर्जन्य जल पातमुखात (आऊटफॉल ) अडकले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ए विभाग, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि पर्जन्य जल वाहिन्या विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून हे पातमुख मोकळे केले. आणि त्यानंतर या पाण्याचा निचरा झाला. त्यामुळे मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या भरावामुळे रुळांवर पाणी आल्याच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई महानगर पालिका प्रशासनाने केले आहे.