women’s day : राज्यात घडला इतिहास, या दोन मेट्रो स्थानकांत महिलांचे राज्य

| Updated on: Mar 03, 2023 | 9:47 PM

मुंबई मेट्रोच्या मेट्रो-7 आणि मेट्रो 2 ( अ ) यांच्या दोन्ही टप्प्यांचे नुकतेच उद्घाटन होऊन आता या मार्गिकांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दोन स्थानकांत संपूर्ण महिला राज दिसणार आहे.

womens day : राज्यात घडला इतिहास, या दोन मेट्रो स्थानकांत महिलांचे राज्य
WOMENS DAY'S (1)
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : महिला आज सर्वच क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. अंतराळापासून जमिनीपर्यंत असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे महिलांचा बोलबाला नाही. अशात आता मुंबईतील नव्यानेच सुरू झालेल्या दोन मेट्रो स्थानकातील ‘ए टू झेड’ कामे महिलाशक्ती करणार आहे. मेट्रो चालविणे, स्टेशन व्यवस्थापन ते प्रवाशांच्या सुरक्षेपर्यंतची अशी सर्व कामे महिला करणार आहेत. एमएमआरडीए ( MMRDA ) आणि एमएमएमओसीएलने  ( MMMOCL )  मेट्रोमधील महिला कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. येत्या 8 मार्चला असलेल्या महिला दिनाच्या ( women’s day ) निमित्ताने हा योग जुळून आला आहे.

मुंबई मेट्रोच्या मेट्रो-7 आणि मेट्रो 2 ( अ ) यांच्या दोन्ही टप्प्यांचे नुकतेच उद्घाटन होऊन आता या मार्गिकांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आता मुंबई मेट्रो प्रशासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी मेट्रो मार्ग 2 अ वरील आकुर्ली आणि मेट्रो मार्ग 7 वरील एक्सर या मेट्रो स्थानकांच्या संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सोपविली आहे. स्टेशन व्यवस्थापकापासून सुरक्षा रक्षक कर्मचार्‍यांपर्यंत 76 महिला कर्मचाऱ्यांमार्फत या दोन स्थानकांचे ‘ए टू झेड’ कामे महिला कर्मचारी करणार आहेत.

तीन शिफ्टमध्ये कार्यरत

आकुर्ली आणि एक्सर या स्थानकांवरील सर्व-महिला कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत असणार आहेत, ज्यामध्ये स्टेशन कंट्रोलर, ओव्हर एक्साइज आणि तिकीट विक्री अधिकारी, शिफ्ट पर्यवेक्षक, ग्राहक सेवा अधिकारी आदी अधिकारी मेट्रो प्रवाशांना सेवा देणार आहेत. तर सुरक्षा आणि सफाई कर्मचारी मेट्रो स्थानकांवरील सुरक्षितता आणि स्वच्छता सांभाळतील. हा उपक्रम केवळ परिवहन व्यवसायातील महिलांच्या क्षमता सिद्ध करणारा नसून इतर महिलांनाही या क्षेत्रात करीयर करण्यासाठी प्रेरीत करणारा ठरेल असे एमएमआरडीए MMRDA  आणि Maha Mumbai Metro Operation Corporation Limited  एमएमएमओसीएलने म्हटले आहे.

महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण

मेट्रोमधील महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासोबत त्यांच्यासाठी स्वतंत्र कपडे बदलण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. तसेच महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र मेट्रोचे राखीव डबे, स्वतंत्र प्रसाधन गृह, आणि 1800 889 0808 हा टोल फ्री मदत क्रमांक पुरविण्यात आला आहे.

958  महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मेट्रोच्या कारभारासाठी सुमारे 958  महिला ( 27 % ) कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या महिला कर्मचारी ते देखभाल आणि दुरुस्ती, एचआर, वित्त आणि प्रशासन या विभागात कार्यरत आहेत. ज्यामधील बरेचसे कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने घेतले आहेत. महा मुंबई मेट्रो स्वतंत्र कार्यक्षेत्र करण्यासाठी वचनबद्ध आहे येथे सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी समान संधी देण्यासाठी कठीबद्ध असल्याचे कंपनीने म्हटले आहे.