दुसरे जागतिक महायुद्ध 1939 मध्ये सुरु झाले होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यास चार वर्षे शिल्लक असताना साल 1944 मध्ये मुंबईत आजच्याच 14 एप्रिल रोजी मोठी दुर्घटना घडली. भारतावर इंग्रजांचे राज्य असल्याने दुसऱ्या महायुद्धात भारतातून ब्रिटनला सैन्य आणि सामुग्रीची वाहतूक मुंबई बंदरातून होत होती. त्यामुळे भारतातील प्रमुख बंदर असलेले मुंबई बंदर या सैनिकांच्या नेआण करण्यामुळे नेहमीच गजबजलेले होते. त्याकाळात मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात घडला. त्यामुळे अख्खी मुंबई आणि परिसर हादरला होता. मुंबईच्या बंदरात उतरलेल्या एका जहाजात हा भयंकर स्फोट झाला होता. त्यामुळे या स्फोटाचे हादरे पार पालघर, मुरुड जंजिरा आणि पुण्यापर्यंत बसले, इतकेच काय तर 1700 किमीवर असलेल्या सिमला येथील भुंकपमापक केंद्रात या हादऱ्यांची नोंद झाली होती. काय झाले होते ? 14 एप्रिल 1944 रोजी पाहूयात….
1944 मध्ये इंग्लंडमधील बर्कल हेड बंदरातून s.s. फोर्ट स्टायकिन हे जहाज मुंबईच्या बंदराकडे माल घेऊन निघाले होते. जहाजात तेल, स्फोटक पदार्थ, दारुगोळा, विमानांचे सुटेभाग आणि सोने लादले होते. उत्तर अटलांटिक महासागर, जिब्राल्टर, भूमध्य सागर, इजिप्त मधले पोर्ट सेल, सुएझ कालवा, लाल सागर, अरब सागर असा प्रवास करीत स्टायकिन जहाज कराचीच्या बंदरात पोहचले. कराचीला 1400 टनाची कापसाच्या बंडले जहाजात भरण्यात आली. स्टायकिनच्या कप्तानाने याचा विरोध केला होता. कारण स्फोटक पदार्थ, तेल आणि कापूस एकत्र ठेवणे म्हणजे हे आगीसारख्या अपघाताला आमंत्रण देणारा प्रकार होता. त्याची ही भीती पुढे मुंबईच्या बंदरातच दुर्दैवाने खरी ठरली. स्फोटके असलेल्या जहाजांना बंदरात शिरु दिले जात नाही. ती दुरवरुन उभी करून छोट्या बोटींद्वारे रिकामी केली जात असतात. तसेच अशा जहाजांची विशेष काळजी घ्यावी यासाठी त्यावर लाल बावटा लावला जातो. परंतू स्टायकिनवर असा कोणताही ‘लाल बावटा’ लावला नव्हता. त्यामुळे त्याला तातडीने रिकामे करता आले नाही.
जहाजाची रेखाकृती पाहा –
12 एप्रिलला हे जहाज मुंबईच्या मस्जिद बंदर जवळील व्हीक्टोरीया डॉकमध्ये आले. त्याच्या शेजारील प्रिन्सेस डॉक आणि व्हीक्टोरीया डॉकमध्ये मिळून त्यावेळी 26 जहाजे उभी होती. 14 एप्रिल रोजी एस.एस. फोर्ट स्टायकिन जहाजातील माल उतरविण्यासाठी हमालाची एक टीम येथे आली. या टीमच्या प्रमुखाला माहीती नव्हते की जहाजात स्फोटक पदार्थ आहेत. जेव्हा दुपारी जेवणाच्या सुट्टीत कामगार बाहेर पडले तेव्हाच नेमकी या जहाजात आग लागली. जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी कोणी नव्हते. दुसऱ्या जहाजातील लोकांनी धुर येताना पाहीला त्यांना वाटले जहाजातील लोक लक्ष देतील म्हणून त्यांनीही दुर्लक्ष केले. या जहाजावर लाल बावटा नसल्याने त्यांना धोक्याची जाणीव झालीच नाही. जेवणानंतर कामगार परत आले तेव्हा त्यांनी आग बघितली आणि ते पळू लागले. फायर ऑफीसरने तातडीने कंट्रोल रुमला कळवायला सांगितले. परंतू अग्निशमन दलाला कळविणाऱ्या व्यक्तीने आगीचे गांभीर्य सांगितले नाही. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उशीरा पोहचले.
स्टायकिन हे जहाज मोठे असल्याने त्यातील माल विविध कप्प्यांमध्ये ठेवला होता. आग वेगळ्या कप्प्यात लागली होती. स्फोटक पदार्थ दुसऱ्या आणि चौथ्या कप्प्यात ठेवले होते. आता जहाजातील आग वाढली होती. ती विझविणे शक्य नव्हते. अग्निशमन दलासमोर दोन पर्याय होते. पहिला पर्याय होता. जहाजाला समुद्रात घेऊन जायचे, परंतू जहाजाचे इंजिन बिघडले होते. मग टग बोटीने हे जहाज बंदरातून ओढून नेण्याचे ठरले, परंतू बंदरात मालाची चढऊताराचे काम जास्त काम सुरु असल्याने त्या उपलब्ध झाल्या नाहीत. दुसरा पर्याय होता जहाजाला आहे तेथे समुद्रात बुडविले. परंतू हा निर्णय घेणारा अधिकारी जागेवर नव्हता. त्यामुळे अखेर अपघात घडला.
एस.एस. स्टायकिन जहाज नादुरुस्त झाले होते. त्यामुळे त्याला तातडीच्या दुरुस्तीची गरज होती. त्यामुळे कराची बंदरात जेव्हा हे जहाज आले तेव्हा कप्तानाने दुरुस्तीची मागणी केली होती. परंतू त्याची ही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे मुंबईच्या व्हीक्टोरिया बंदरात जेव्हा हे जहाज आणले तेव्हा त्याचे इंजिन खोलून दुरुस्ती सुरु करण्यात आली. त्यामुळे जेव्हा आग लागली तेव्हा जहाजाला गोदीच्या बाहेर काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्याला समुद्रात बुडवून आग विझविण्याचा मार्ग बंद झाला होता.
आता स्टायकिनच्या दुसऱ्या कप्प्यात पहिला स्फोट 4.06 वाजता झाल्याने जहाजाचे दोन तुकडे झाले. पेटलेली कापसाची बंडले आजूबाजूला आकाशात सर्वत्र उंच उडाल्याने सर्वत्र आग पसरली. जळालेला कापूस चौथ्या कप्प्यात पडून तेथेही आग लागली. 4.40 वाजता दुसरा स्फोट झाला जो खूपच भयंकर होता. या स्फोटाचा हादऱ्याने शेजारी उभे असलेले जहाज आकाशात साठ फूट उडून बंदरात येऊन पडले. या स्फोटाचा आवाज शेजारील खोपोली, पुणे, पालघर, मुरुड जंजिऱ्यापर्यंत बसला. या स्फोटाची नोंद मुंबईहून 1700 किमी दूर असलेल्या सिमलाच्या भूकंपमापक केंद्राने देखील घेतली. स्फोटाच्या भोवतालचा तीनशे एकराचा परिसर जळून खाक झाला. मांडवी, मस्जिद बंदर, डोंगरीत मानवी वस्त्यांमध्ये देखील आग पसरली.
गोदीतील या स्फोटामुळे अभिनेत्री मधुबाला यांचे घर देखील बेचिराख झाल्याचे म्हटले जाते. त्यावेळी मधुबाला केवळ अकरा वर्षांच्या होत्या. त्या कुटुंबियासोबत चित्रपट पहायला गेल्याने त्यांचे कुटुंब आणि त्या वाचल्या. या दुर्घटनेत आठशे ते तेराशे नागरिक मृत्यूमुखी तर तीन हजार जण जखमी झाल्याचे म्हटले जाते. या दुर्घटनेत मुंबईच्या अग्निशमन दलाच्या 66 जवानांचा देखील बळी गेला होता. या जहाजात सोन्याच्या विटा देखील होत्या. जेव्हा स्फोट झाला तेव्हा यातील काही सोन्याच्या विटा आकाशात उडाल्याचे म्हटले जाते. धोबीतलाव जवळ एका पारसी गृहस्थाच्या घरी छप्पर फाडून एक सोन्याची विट आल्याचे म्हटले जाते. या पारसी गृहस्थाने ही सोन्याची विट पोलिसांना परत केली. त्याची किंमत आताच्या सव्वा कोटी रुपयांइतकी होती. त्याकाळी सर्व सोन्याच्या विटा पोलिसांना परत केल्या गेल्या असे म्हटले जाते.
1971 नंतर भारतात 14 एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबईतील व्हीक्टोरीया गोदी स्फोटात सेवा बजावताना शहीद झालेल्या मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत दोन स्मारके उभारली गेली आहेत, एक स्मारक व्हीक्टोरीया गोदीत आहे. तेथे सर्वसामान्यांना जाता येत नाही, दुसरे स्मारक भायखळा येथील अग्निशमन मुख्यालयाच्या शेजारीच उभे आहे. देशभरातील अग्निशमन दले हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून दरवर्षी साजरा करीत असतात. दरवर्षी 14 एप्रिल ते 20 एप्रिल असा अग्निशमन सेवा सप्ताह साजरा केला जातो.