वरळीतील भल्या पहाटे घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. दुचाकीवरील दाम्पत्याला ठोकरल्यानंतर महिलेला फरफटत नेण्याची घटना वरळीत घडली होती. भल्या पहाटे झालेल्या या अपघातात महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. आता या प्रकरणात पोलिसांनी शिंदे गटातील उपनेत्याला ताब्यात घेतले आहे. त्याची कार पण सापडली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार ही कार उपनेत्याचा मुलगा चालवत होता.
उपनेते राजेश शाह ताब्यात
भल्या पहाटे 5:30 वाजता हा अपघात घडला. प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटातील उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे. राजेश शाह यांचा मुलगा आणि ड्रायव्हर चारचाकीत असल्याचे समोर येत आहे. दुचाकीला कारची मागून धडक बसली. त्यानंतर कारचालक घटनास्थळावरुन कारसह फरार झाले होते. मुलगा आणि कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणात पुढील तपास करत आहे.
मिहीर शाह कार चालवत होता
मुलगा आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह हा कार चालवत असल्याचे समोर आले आहे. आता हे प्रकरण ड्रंक अँड ड्राईव्हचे तर नाही ना, यादृष्टीने पण पोलिसांनी तपास करत आहेत. प्लेटवरुन ही कार राजेश शहा यांच्या नावावर असल्याचे समोर आले. ते कारमध्ये नव्हते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. याविषयी पुढील तपासात बाबी समोर येतील.
भल्या पहाटे घडला अपघात
वरळीत भल्या पहाटे हिट अँड रनची घटना घडल्याचे समोर आले होते. मच्छी आणण्याठी गेलेल्या कोळी दांपत्याला पहाटे ५:३० वा चार चाकीने फरफटत नेले . वरळीतील अॅट्रीया मॉलजवळ ही घटना घडल्याचे समोर आले होते. वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा दांपत्य हे सकाळी ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेले होते. मच्छी घेऊन परतत असताना एका चारचाकीने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.
महिलेला नेले फरफटत
दुचाकीवर मोठ्याप्रमाणात मच्छी वाहून नेत असल्याने त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि दोघंही चार चाकीच्या बोनटवर पडले. त्यावेळी वेळीच नवऱ्याने कारच्या बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला स्वत:ला बाजूला होता आलं नाही. अशातच अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने कार काही थांबवली नाही आणि त्याने कार दामटली. त्यात कोळी महिलेला फरफटत गेली. तिला उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.