मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी सध्या अनिल देशमुखांकडून कायदेशीर बाबींचा अंदाज घेतला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि गृहखात्याच्या अतिरिक्त सचिवांशी नुकतीच चर्चा केली. त्यांच्या सल्ल्याने आता अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. (Anil Deshmukh may go into SC against Parambir Singh)
तर दुसरीकडे महाविकासआघाडी सरकारकडून डॅमेज कंट्रोलसाठी परमबीर सिंह यांनी लिहलेल्या पत्राची चौकशी करण्यासाठी सरकारी समिती नेमली जाण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह न्यायालयात गेल्याने ठाकरे सरकार हे पाऊल उचलणार असल्याची चर्चा आहे. याप्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत याप्रकरणाची चौकशी होऊ शकते. येत्या गुरुवारी परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच ठाकरे सरकारकडून समिती नेमली जाऊ शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. भाजप नेत्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून डॅमेज कंट्रोलसाठी मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडील गृहमंत्रिपद काढून दुसरं खातं सोपवलं जाण्याची शक्यता आहे. देशमुखांवरील आरोपांमुळे हे फेरबदल होणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
संबंधित बातम्या:
मग परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टातील याचिका खोटी आहे का?; चंद्रकांतदादांचा वर्मावर घाव
शरद पवार का बनले अनिल देशमुखांची ढाल?, काय आहे त्या मागचे राजकारण?; वाचा सविस्तर
परमबीर सिंग यांची प्रॉपर्टी किती, जनतेला कळू द्या, राष्ट्रवादीची मोठी मागणी
परमबीर सिंगांचा दुसरा मोठा दावा, रश्मी शुक्लांनीही देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली होती!
(Anil Deshmukh may go into SC against Parambir Singh)