मुंबई : शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे भाऊ आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय असलेले सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना ई़डीने काल चार तासांच्या चौकशीनंतर अटक केली. त्यानंतर त्यांना आज हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात ईडीच्या वकिलांनी त्यांची 14 दिवसांची कोठडी मागितली. पण कोर्टाने सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विशेष म्हणजे कोर्टात ईडीच्या वकिलांनी सुद्धा अनिल परब यांचं थेट नाव घेतल्याने आता या प्रकरणात अधिकृतपणे अनिल परब यांच्या नावाची एन्ट्री झाल्याची चर्चा आहे.
अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या माध्यमातून विभास साठे यांना 80 लाख रुपये दिले, असा दावा ईडीच्या वकिलांनी कोर्टात केला. तसेच बंगल्यांना रिसॉर्टमध्ये बदलण्याचा निर्णय अनिल परब यांनी घेतला, असं ईडीने कोर्टात म्हटलं आहे. विशेष म्हणजे ईडीने या प्रकरणाच्या तपासासाठी सदानंद कदम यांच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. पण सदानंद कदम यांच्या वकिलांनी या कारवाईला चांगलाच विरोध केला. ईडीने केलेली कारवाई कशाप्रकारे चुकीची आहे, असा युक्तिवाद सदानंद कदम यांच्या वकिलांनी कोर्टात केला. तर दुसरीकडे ईडीकडूनही जोरदार युक्तिवाद करण्यात आला. अखेर कोर्टाने संदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
अनिल परब यांच्या सांगण्यावरुन सदानंद कदम यांनी विभास साठे यांच्यासोबत 80 लाखांचा व्यवहार केला. जवळपास 54 लाखात साई रिसॉर्टची बांधणी करण्यात आली. पण ऑन रेकॉर्ड त्याची किंमत साडेतीन कोटी रुपये दाखवण्यात आली. त्यामुळे हे सगळे पैसे नेमके कुठून आले? याचा तपास आम्हाला करायचा आहे. काही साक्षीदारांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. या सगळ्या प्रकारामध्ये खोलवर जाऊन तपास करायचा आहे, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला.
या प्रकरणी ईडीकडून आगामी काळात आणखी काही जणांना बोलावलं जाण्याची शक्यता आहे. येत्या काळात अनिल परब यांना सुद्धा पुन्हा समन्स देवून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. ईडीकडून कोर्टामध्ये वेळोवेळी अनिल परब हेच साई रिसॉर्टचे मालक आहेत. त्यांनीच आपल्या राजकीय बळाचा वापर करुन कुठेतरी दबाव टाकून डॉक्युमेंट्सध्ये गडबड करुन साई रिसॉर्टशी संबंधित परवानगी मिळवलेली होती. साई रिसॉर्टचं बांधकाम करताना CRZचं उल्लंघन झालेलं होतं. त्यामुळे सगळा गैरव्यवहार झाला, असं ईडीकडून सांगण्यात आलं. सदानंद कदम या प्रकरणातील महत्त्वाचे आरोपी आहेत, असंही ईडीने कोर्टात म्हटलं.