मुंबई: सचिन वाझे प्रकरणानंतर राज्यातील पोलीस दलात मोठे बदल करणाऱ्या ठाकरे सरकारसमोर एक नवा पेच उभा राहिला आहे. पोलीस दलातील या तडकाफडकी ‘अदलाबदली’मुळे वरिष्ठ अधिकारी संजय पांडे (Sanjay Pandey) हे दुखावले गेले आहेत. संजय पांडे हे 1986च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. परमबीर सिंह यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले. (Police officers not happy with reshuffle in Police unit by Thackeray government)
या बदलीमुळे संजय पांडे प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात संजय पांडे यांनी नेहमी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली आहे. आपली क्षमता असूनही दरवेळी आपल्याला साईडलाईन करण्यात आले. कुवत असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद आपल्याला मिळाले नाही. आतादेखील पोलीस महासंचालकपद किंवा मुंबई पोलीस आयुक्तपद रिक्त झाले असतानाही संधी देण्यात आली नाही. याउलट माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्याला ते पद देण्यात आले, अशी खंत संजय पांडे यांनी व्यक्त केली.
या पत्रात संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांच्यावरही ताशेरे ओढले आहेत. परमबीर सिंह यांचे काम व्यवस्थित नाही. त्यांनी आपल्याला एका प्रकरणाच्या तपासात सहकार्य न केल्याचेही संजय पांडे यांनी बोलून दाखवले आहे.
परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी आज या विभागाचा पदभार स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र, ते आज होमगार्डच्या मुख्यालयात जाणार नाहीत. ते मोठ्या सुट्टीवर जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
हेमंत नगराळे- मुंबई पोलीस आयुक्त
रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी
परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी
संबंधित बातम्या:
अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
(Police officers not happy with reshuffle in Police unit by Thackeray government)