चित्रपटातून तुम्ही नेहमी एका मुलाची त्याच्या कुटुंबापासून ताटातूट होताना पाहिले असेल. पण त्याच्या शरीरावरील एका खूणेमुळे, निशाणीमुळे तो पुढे सापडतो. त्याची जन्मखूणच त्याच्या ओळखीस कारणीभूत ठरते. तो त्याच्या आई-वडिलांना आणि आई-वडील त्याला ओळखतात. चित्रपटाचा शेवट असा नेहमी गोड होताना आपण पाहतो. पण मुंबईत अशीच कमाल घटना घडली आहे. कारण इथं जन्मखूण नाही तर मुलाच्या गळ्यातील QR कोडच्या मदतीने त्याला हडकून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. नेमकी काय आहे ही घटना, कशी मिळाली या मीसिंग केसला कलाटणी जाणून घेऊयात..
आधुनिक तंत्रज्ञानाचा चमत्कार
आधुनकि तंत्रज्ञानाच्या चमत्कारने हा मुलगा गवसला आहे. मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एक गतिमंद मुलगा अचानक गायब झाला. त्याचे आई-वडिलच नाही तर पोलिसांचे मन सुद्धा या घटनेने द्रवले. त्यांनी जंग जंग पछाडले. पण त्याचा शोध लागत नव्हता. पण त्याच्या गळ्यातील क्यूआर कोडने सर्व कोडंच सोडवलं आणि मुलगा काही तासाच आई-वडिलांकडे सोपविला गेला. तेव्हा या कुटुंबाचा आनंद पाहण्यासारखा होता.
खेळता-खेळता चढला बसमध्ये
हा गतिमंद मुलगा 12 वर्षांचा आहे. तो खेळता खेळता बसमध्ये चढला. त्यानंतर तो हरवला. त्याच्या कुटुंबियांनी अनेक भागात त्याचा शोध घेतला. पण त्याचा काही पत्ता लागला नाही. पोलिसांनी पण त्याचा खूप तपास केला. पण निराशाच हाती लागली. गुरुवारी शहरातील दक्षिण कुलाब्यात तो एकाच भटकत असताना दिसला. सतर्क नागरिकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याची विचारपूस केली. पण त्याचे नाव पण आठवत नव्हते आणि माहिती पण सांगता येत नव्हती. पोलिसांना त्याची काळजी घेतली.
अन् झाला चमत्कार
पोलिसांनी या मुलाला पोलीस ठाण्यात आणले. तो हरवल्याची सूचना सर्वच पोलीस ठाण्यांना देण्यात आली. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. पण तेवढ्या वेळेतही काही विशेष हाती लागले नाही. त्यावेळी एका पोलिस कर्मचाऱ्याचे त्याच्या गळ्यातील लॉकेटकडे लक्ष गेले. त्यांनी ते लॉकेट उघडले. तर त्यात एक QR Code दिसला. पोलिसांनी तातडीने हा कोड स्कॅन केला. तेव्हा त्यात एक मोबाईल क्रमांक असल्याचे समजले. त्यांनी त्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला. तेव्हा पोलिसांच्या मनावरील काळजीचे ढग दूर झाले.
हा मोबाईल क्रमांक गतीमंद, दिव्यांग मुलांसंबंधी समाजकार्य करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेचा असल्याचे समोर आले. एनजीओचे सदस्य दाखल झाल्यानंतर हा मुलगा वरळी भागातील असल्याचे समोर आले. एनजीओच्या अधिकाऱ्यांनी मुलाच्या पालकाशी संवाद साधला. ते पण धावत पळत आले. त्यांना पाहताच मुलगा आईच्या कुशीत शिरला. त्यावेळी वर्दीतील कडक माणूस पण काही वेळ गहिवरला.