मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून लढण्याचं आव्हान देत आहेत. त्यामुळे राजकीय आव्हान प्रतिव्हानं देण्यास सुरुवात झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं असलं तरी आदित्य ठाकरे हे वरळीतून कसे निवडून आले याचा गौप्यस्फोटच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. आदित्य ठाकरे पराभूत होतील म्हणून शिवसेना विरोधकांना घाबरली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा विजय सोपा व्हावा म्हणून सचिन अहिर यांना शिवसेनेत घेण्यात आलं, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. केसरकर यांच्या या दाव्यावर अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून लढण्याचं आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्री शिंदे हे तरुणाला घाबरले असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना विचारण्यात आलं असता त्यांनी वेगळाच गौप्यस्फोट करून ठाकरे गटाचा पर्दाफाश केला.
तरुणाला कोणीही घाबरत नाही. एक तर आदित्य ठाकरे यांना निवडणुकीला उभं केलं. तेव्हा ते विरोधकांना घाबरले. सचिन अहिर यांना विनंती करून आपल्या पक्षात घेतलं. त्यानंतर उमेदवारी भरू नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकला. त्यानंतर त्यांना आमदार केलं. हा सर्व इतिहास आहे. पडताळून पाहा, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.
एका मतदारसंघासाठी दोन एमएलसी करायच्या तर आपली आमदार संख्या 288 आहे. ती 560 करावी लागेल. एका आमदारापाठी दोन एमएलसी असं करून लोक जिंकत असतील तर लोकशाहीचा ढाचाच कोसळेल. हे करणारे आदित्य ठाकरे आहेत. दुसरं तिसरं कोणी नाही.
त्यांच्यासाठी दोनच काय चार एमएलसी करा. आम्हाला काही म्हणायचं नाही. तो त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. पण जे नेते लोकांचा आशीर्वाद घेऊन विजयी होतात. त्यांच्यावर बोट दाखवू नका, असा टोला त्यांनी लगावले.
यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या बंडावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमचा वाद उद्धव ठाकरे यांच्याशी नव्हताच. महाविकास आघाडीसोबतची युती तोडावी आणि भाजपसोबत युती करावी हेच आमचं म्हणणं होतं.
आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडतो म्हणून सांगा आम्ही सर्वच्या सर्व मुंबईला येतो, असं आम्ही तेव्हा वारंवार म्हणत होतो. आम्ही गद्दारी केली नाही. आम्ही पक्ष सोडला नाही. उलट आम्हीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडण्याची मागणी करत होतो, असंही ते म्हणाले.
आपण कधीही मंत्रिपद मागितलं नव्हतं असंही त्यांनी सांगितलं. मला मंत्रीपद देऊ नका. मी मंत्रिपदासाठी हे करत नाही. असं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं. तेव्हा अनेकांनी मला विचारलं तुम्ही असं कसं करता. त्यावर असं करायचं असतं.
कारण खऱ्या माणसाची पारख नसते, असं मी सांगितलं, असं सांगतानाच मलाही तेव्हा इतरांकडून अनेक ऑफर होत्या. मीही त्या ऑफर स्वीकारल्या असत्या तर कॅबिनेट मंत्री झालो असतो, असा दावाही त्यांनी केला.