मुंबई : उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या (Accidental death) अपघाती निधनानंतर प्रत्येक बाबींचा अहवाल आता समोर येऊ लागला आहे. नेमका अपघात झाला कसा याअनुशंगाने आता तपास सुरु आहे. घटनेच्या चार दिवसानंतर (Mercedes Company) मर्सिडिज कंपनीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यामध्ये गाडीचा वेग किती होता? घटनेपूर्वी कधी ब्रेक लावण्यात आले होते? तर अपघात दरम्यान गाडीचा वेग किती होता अशा बाबी समोर आल्या आहेत. या कंपनीने हा खुलासा (Palghar Police) पालघर पोलिसांकडे केला आहे. तपासाच्या अनुषंगाने मर्सिडिजने केलेला खुलासा हा महत्वाचा मानला जात आहे. मुंबईपासून 100 किमी अंतरावरच हा भीषण अपघात झाला होता. या दरम्यान मिस्त्री यांच्या गाडीत चार जण प्रवास करीत होते.
सायरस मिस्त्री हे आपल्या सहकार्यांसोबत अहमदाबादहून मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, एका पुलावरील दुभाजकाला त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. मर्सिडिज कंपनीच्या अहवालानुसार त्या कारचा वेग हा ताशी 100 किमी असा होता. तर अपघाताच्या 5 सेकंद आधी चालक अनहिता पंडोले यांनी ब्रेक लावले होते, त्यामुळे गाडीचा वेग हा 89 किमी प्रतितासावरून थेट 11 किमी प्रतितास इतक्यावर आला होता. या वेगातच गाडीचा अपघात झाल्याचे मर्सिडिजच्या प्राथमिक अहवालात म्हटले गेले आहे.
गाडीमधील एअर बॅगमुळे का होईना मिस्त्री यांचे प्राण वाचायला पाहिजे होते, असे म्हटले जात आहे. आरटीओने अपघाता दरम्यान एअरबॅगची काय अवस्था होती, हे देखील अहवालात नमूद केले आहे. अपघात झाला तेव्हा गाडीतील चारही एअरबॅग ह्या उघडण्यात आल्या होत्या. यामधील तीन एअर बॅग ह्या चालकासमोरील होत्या तर एक चालकाच्या बाजूच्या सीटवरील उघडली गेली होती.
मर्सिडिजच्या अहवालावर पोलिसांनी काही प्रश्नही उपस्थित केले होते, गाडीचा वेग 100 किमी तासी होता हे खरे असले तरी त्यापूर्वी चालक अनहिताने किती वेळा ब्रेक लावला होता? याबाबत अधिकची माहिती देण्यासाठी संबंधित कार ही शोरुमकडे नेली जाणार आहे. 12 सप्टेंबर रोजी ही कार शोरुमध्ये असेल तर तपासणीसाठी हाँगकाँगहून एक पथक दाखल होणार आहे. त्यानंतर सर्व अहवाल समोर राहणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. हाँगकाँगहून येण्यासाठी व्हिसासाठी अर्जही केला आहे. 48 तासांमध्ये व्हिसा मिळाला तर मर्सिडिज कंपनीची टीम गाडीची तपासणी करणार आहे.