मुंबईमध्ये आता फिरताना किल्ल्यासारखं किंवा पडक्या राजवाड्यासारखं काहीतरी दिसतं. नव्या पिढीला आता एखाद्या गोष्टीसारखं सांगावं लागतं की ही कापड गिरण होती. भव्यदिव्य दिसत असलेलं हे नेमकं काय? असा प्रश्न त्यांना पडत असावा. पण हेच जर 70 आणि 80च्या दशकातील गिरणी कामगार मुंबईत आल्यावर टोलेगंज इमारती पाहून आपसूकच मनातल्या मनात विचार करेल. गड्या इथं तर मोरारजी, मफतलाल, सेंच्युरी मिल होती ना? मात्र आता सर्व काही बदलून गेलंय. मुंबापुरीचं सर्व रूपडंच आता पालटलंय. बुलेट ट्रेन, मोनो रेलचे ब्रिज तर मोठ्या-मोठ्या इमारती. हे सर्व पाहिल्यावर गिरणी कामगाराला त्याचे त्यावेळचे दिवस आठवल्याशिवाय राहणार नाहीत. पण तुम्हाला माहिती का आता मुंबईमध्ये ज्या ठिकाणी गिरणी होत्या त्या ठिकाणी आता काय आहे? जाणून घ्या.
मुंबईमध्ये एकूण 62 कापड गिरण्या होत्या, मुंबईमधील लालबाग, लोअर परेल, दादर, भायखळा आणि परेल हा गिरणगावचा परिसर होता. मुंबईतील जवळपास सर्वाधिक गिरण या भागांमध्येच होत्या. एका गिरणीमध्ये जवळपास दहा ते बारा हजार गिरणी कामगार तीन शिफ्टमध्ये काम करत होते. गिरणी कामगारांचा 1982 चा संप दीड वर्षे चालला मात्र कामगारांचा धीर सुटला आणि ऐतिहासिक संप विखुरला गेला. मात्र या संपानंतर गिरणी सुरू झाल्या होत्या मग तरीसुद्धा कापड गिरणी का बंद पडल्या? संपानंतर या गिरणी कामगारांच्या घरी काय परिस्थिती होती?
1 नोव्हेंबर 1981 रोजी शिवसेना पक्षाच्या गिरणी कामगार सेनेने खरी संपाची घोषणा केली होती. मात्र काही दिवसातच म्हणजे 15 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली. त्यावेळी गिरण कामगार नाराज झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्याससोबत चर्चा झाल्यावर बाळासाहेबांनी संप मागे घेतला होता. गिरणी कामगारांनी त्यानंतर डॉ. दत्ता सामंत यांनी संपाचं नेतृत्त्व केलं. हा संप जवळपास अठरा महिने सुरू राहिला मात्र गिरणी मालक आणि सरकारने मिळून संप फोडल्याचं कामगार उघडपणे सांगतात.
गिरणी कामगारांची मुले बेरोजगारीमुळे आणि उपासमारीमुळे भाईगिरीकडे जाऊ लागलीत. अंडरवर्ल्डनेही या मुलांना हाताशी धरत आपली कामं करून घेतलीच. यामधील अनेक नामांकित गुंडांनीही गिरणीचा संप फोडण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती दत्ता सामंत यांचे जवळचे सहकारी जयप्रकाश भिलारे यांनी दिली. संपकाळात गिरणी कामगारांनी गावचा रस्ता धरला, पण काहीजण मुंबईतच राहायला होते. त्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल झाले. घरची चुल विझली होती, घरातील कर्ता माणूसच घरी बसल्याने महिला बाहेर पडल्या. या महिला दादर, माटुंगा या वस्त्यांमध्ये धुणी-भांडी करू लागल्या. गिरणी कामगाराची पोरं दुधाची आणि पेपरची लाईन चालवू लागली. मात्र इतकं सगळं करूनही हे पुरेस नव्हतं. कामगारांची पोर नशाबाज झालेली, त्यावेळी काही तरूणांनी बंद पडलेल्या गिरणीमधील भंगार चोरून आपली तलफ भागवली. मुंबईमध्ये कोणी कधी उपाशी झोपत नाही असं बोललं जातं. मात्र 80 च्या दशकात मुंबईला ओळख देणारा गिरण कामगार उपाशी झोपलाय.
पोटात आग पडल्यामुळे काहीही करण्यासाठी त्यांची तयारी होती. मुंबईतील मोठ्या भाईंनी या मुलांना हाताशी पकडत स्मगलिंगसाठी यांचा उपयोग करून घेतला. गिरणी संपामुळे निर्माण झालेला बेकारांचा तांडा गुन्हेगारी जगताला मॅन पॉवर पुरवू लागला होता. त्यामुळे अनेक मराठी मुले या गंँग चालवू लागली. मात्र यामधील अनेकजण पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. गिरण गावामधील बऱ्याच तरुणी डान्स बारमध्ये गेल्या. कारण झटपट पैसा मिळत होता, आपला बाप घरात असल्याने पोरांनी पैशासाठी कोणताही मार्ग अवलंबण्याची तयारी दर्शवली. गिरणी संप फुटला कामगार परतले होते मात्र यामध्ये सर्व कामगार माघारी नव्हते आले. दीड लाख कामगार परतल्याची माहिती आहे. यामध्ये नव्याने भरती झालेल्या अनेक तरूण गिरणी कामगारांचा समावेश होता. पण जुना गिरणी कामगार जो गावी गेला होता तो काही परतला नाही.
गिरणी कामगारांचा संप काही यशस्वी झाला नाही. काही कामगार परतले आणि पुन्हा एकदा मुंबापुरी गिरणीच्या भोंग्याने दणाणू लागली. मात्र तरीही त्यानंतर कापड गिरण का बंद झाल्या? या कापड गिरणी बंद होण्यामागे नव्याने करण्यात आलेला कायदा जास्त कारणीभूत ठरला. हा कायदा म्हणजे डीसीआर. (Development Control Rule)
भारतावर जेव्हा ब्रिटिश राज्य करत होते. भारतामध्ये ब्रिटिशांनी कापड गिरणी उभारल्या होत्या. त्यांनीच 1891 साली हा (डीसीआर) कायदा आणला होता. हा कायदा नेमका काय होता आधी ते समजून घ्या. उद्योगासाठीच्या जमीनीवरचा उद्योग बंद पडला तर त्या जमिनीवर त्याच कॅटेगिरीचा उद्योग उभारायचा. दुसरा कोणताही विकास करायचा नाही. मात्र 1991 साली या डीसीआर कायद्यामध्ये बदल करण्यात आला. या जागा दुसऱ्या कोणत्याही विकासासाठी म्हणजे अगदी रेसिडेन्सियल प्रकल्पासाठीही वापरण्यात येणार असा हा महत्त्वाचा बदल सरकारकडून करण्यात आला. या बदललेल्या डीसीआर कायद्यामुळे गिरणीच्या माालकांना हजारो कोटींच्या जमीनीवर मोठ-मोठ्या प्रोजेक्टची स्वप्न पडू लागली. ज्या गिरणी कमी मनुष्यबळामध्ये सुरू होत्या त्याही बंद पाडण्याची षडयंत्र रचली जाऊ लागली.
सरकारने या गिरणी कपन्यांना चोरून मदत केल्याच्या चर्चाही दबक्या आवाजात होत्या. जे उद्योग नफ्यात होते तेही उद्योग बंद पाडले गेले. गिरणीसोबत काही केमिकल कंपन्यांसह आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री होत्या. यामध्ये ग्लॅक्सो, सिमेन्स मुकुंदसारख्या कंपन्या बंद पडल्या. कारण डीसीआर कायदयामुळे जमिनींना सोन्यासारखा भाव आला होता. या कायद्याला सामंत यांनी विरोध केला होता, या नव्या कायद्याच्या विरोधात सामंत यांनी कोर्टात जाण्याची तयारी केली होती. ही गोष्ट गिरणी मालकांसह काही राजकीय पुढाऱ्यांना अडचणीची ठरणारी होती. गिरणी संप संपल्यावरही दत्ता सामंत यांनी आपला लढा सुरू ठेवला होता. मात्र गुंडांनी 16 जानेवारी 1997 साली दत्ता सामंत यांची 17 गोळ्या घालून हत्या केली.
जुन्या गिरण्यांची नावं | स्थळ | आता त्या ठिकाणी काय? |
---|---|---|
अंबिका मिल्स | वरळी | नमस्ते टॉवर |
अपोलो मिल्स (दक्षिण) | महालक्ष्मी | लोढा बेलिसिमो/प्राइमरो |
भारत मिल्स | लालबाग | हिला टॉवर्स |
बॉम्बे डाईंग (स्प्रिंग मिल्स | दादर | स्प्रिंग मिल्स टॉवर |
बॉम्बे डाईंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी | वरळी | हार्ड रॉक कॅफे / ICC बॉम्बे रियल्टी |
ब्रॅडबरी मिल्स | महालक्ष्मी | No Development |
सेंच्युरी स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स | वरळी | सेंच्युरी बझार |
चायना मिल कंपाउंड | शिवडी | दोस्ती फ्लेमिंगो |
डॉन मिल्स लोअर | परेल | प्रायद्वीप/पिरामल प्रकल्प |
दिग्विजय मिल्स | काळाचौकी | No development |
एल्फिन्स्टन मिल्स (दक्षिण) | एल्फिन्स्टन | इंडियाबुल्स फायनान्स सेंटर आणि इंडियाबुल्स स्काय सूट्स |
एम्पायर मिल्स लोअर | परळ | एम्पायर बिझनेस पार्क |
गोकुळदास मोरारजी मिल्स नंबर १ | परळ | अशोक टॉवर्स |
गोकुळदास मोरारजी मिल्स नं.2 | लोअर परळ | पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क |
गोल्ड मोहूर मिल्स | दादर | विकास नाही |
हिंदुस्थान स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स नंबर १ | जेकब सर्कल | रहेजा विवरे |
हिंदुस्तान स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स क्र. २ | जेकब सर्कल | कल्पतरू हाइट्स |
हिंदुस्तान स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स क्र. 3 (क्राऊन मिल्स) | प्रभादेवी | ऑर्किड क्राउन |
हिंदुस्तान स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स क्र. 4 | प्रभादेवी | हबटाऊन - 25 दक्षिण |
इंडिया युनायटेड डाई वर्क्स क्र.6 (उत्तर) | प्रभादेवी | इंदू मिल कंपाऊंड |
इंडिया युनायटेड मिल्स क्र. 1 (उत्तर) | करी रोड | No Development |
इंडिया युनायटेड मिल्स क्र. 2 | काळाचौकी | MCGM |
इंडिया युनायटेड मिल्स क्र. 3 | काळाचौकी | MCGM |
इंडिया युनायटेड मिल्स क्र. 4 | काळाचौकी म्हाडा | MHADA |
इंडिया युनायटेड मिल्स क्र.5 | भायखळा | No Development |
इंडिया युनायटेड मिल्स क्र.6 | माहीम | No Development |
जाम मिल्स लालबाग म्हाडा | लालबाग | MHADA |
ज्युपिटर मिल्स (दक्षिण) | लोअर परळ | इंडियाबुल्स स्काय |
कमला मिल्स | लोअर परळ | कमला सिटी |
खटाऊ माकांजी स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स | भायखळा | माँटे-दक्षिण |
कोहिनूर मिल्स क्र. १ (उत्तर) | दादर (पू) | No Development |
कोहिनूर मिल्स क्र.2 (उत्तर) | दादर (पू) | No Development |
कोहिनूर मिल्स क्र.3 (उत्तर) | दादर(पू) | कोहिनूर मिल मॉल |
मधुसूदन मिल्स | वरळी | एनपार लोटस टॉवर्स |
मफतलाल मिल्स क्र.१ | भायखळा | पिरामल अरण्य |
मफतलाल मिल्स क्र.2 | भायखळा | - |
मफतलाल मिल्स क्र.3 | लोअर परळ | मॅरेथॉन फ्युचरेक्स |
मातृदास मिल्स | लोअर परळ | मातृदास मिल्स कंपाउंड्स |
मातुल्य मिल्स | लोअर परळ | सन पलाझो, ॲशफोर्ड कासा ग्रांडे |
मुकेश टेक्सटाईल मिल्स | कुलाबा | बॉलीवूड चित्रीकरणाचे ठिकाण |
मॉडर्न मिल्स | जेकब सर्कल | महिंद्रा बेलवेडेरे कोर्ट |
मोरारजी टेक्सटाईल मिल्स | परळ | अशोक टॉवर्स |
मुंबई टेक्सटाईल मिल्स (साक्सेरिया मिल्स) | लोअर परळ | लोढा द पार्क |
बॉम्बे एमएफजी मिल्स | काळाचौकी | No Development |
न्यू ग्रेट ईस्टर्न स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स | भायखळा | पेनिन्सुला जमीन (Under Construction) |
न्यू हिंद टेक्सटाईल मिल्स | भायखळा | MHADA |
न्यू इस्लाम मिल्स | परळ | वन अविघ्ना पार्क |
पॅरागॉन मिल्स | वरळी | पॅरागॉन सेंटर |
फिनिक्स मिल्स | लोअर परळ | हाय स्ट्रीट फिनिक्स |
पिरामल स्पिनिंग अँड विव्हिंग मिल्स | लोअर परळ | मॅरेथॉन नेक्स्टजेन मॅरेथॉन ग्रुप |
पोद्दार मिल | लोअर परळ | No Development |
पोद्दार प्रोसेसर्स (एडवर्ड मिल्स) | वरळी | इंडियाबुल्स ब्लू |
प्रकाश कॉटन मिल्स | वरळी | No Development |
रघुवंशी मिल्स | लोअर परळ | K- Lifestyle |
रुबी मिल्स | दादर | रुबी कॉर्पोरेट पार्क |
शक्ती मिल | वरळी | No Development |
श्री मधुसूदन मिल्स (दक्षिण) | ||
श्री राम मिल्स | वरळी | Palais रॉयल, मुंबई |
श्रीनिवास मिल्स | लोअर परळ | वर्ल्ड वन |
सिम्प्लेक्स मिल्स | जेकब सर्कल | प्लॅनेट गोदरेज |
सीताराम मिल्स | महालक्ष्मी | MCGM |
स्टँडर्ड मिल्स | प्रभादेवी | शेठ ब्यूमोंडे आणि चैतन्य टॉवर्स |
सन मिल्स कंपाउंड | वरळी | झेंझी मिल्स क्लब / लोखंडवाला व्हिक्टोरि |
स्वदेशी मिल | कुर्ला | No Development |
स्वान मिल्स | शिवडी | अशोक गार्डन्स |
तोडी मिल्स | लोअर परेल | तोडी मिल कंपाऊंड |
टाटा मिल्स (उत्तर) | दादर (पू) | No Development |
उमरी मिल्स | लोअर परळ | उर्मी इस्टेट |
ट्रिनिटी मिल्स | प्रभादेवी | समर ट्रिनिटी |
व्हिक्टोरिया मिल्स | लोअर परळ | व्हिक्टोरिया हाउस (व्यावसायिक) आणि कार पार्क |
वेस्टर्न इंडिया स्पिनिंग आणि विव्हिंग मिल | काळाचौकी | No Development |
वरील यादी पाहिली तर लक्षात येईल की आता या गिरणींच्या ठिकाणी काय आहे. परळमधील ‘न्यू इस्लाम मिल्स’च्या जागेवर ‘वन अविघ्न पार्क’ ही भारतातील 16 वी सर्वात उंच 64 मजली इमारत बांधली आहे. तर महालक्ष्मी येथे असलेल्या शक्ती कापड गिरणीच्या काही जागेसाठी पश्चिम रेल्वेने कोर्टात धाव घेतली आहे. पश्चिम रेल्वेला रेल्वेमार्गाचा विस्तार करण्यासाठी म्हणजेच पाचवी आणि सहावी मार्गिका तयार करण्यासाठी शक्ती मिलची जागा हवी आहे. यासाठी रेल्वे कोर्टात गेली आहे.
दरम्यान, काही गिरणी कामगारांची तिसरी पिढी आता या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करताना दिसते. नातवंडे आवर्जुन आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना सांगतात की इथे ही कापड गिरण होती. या गिरणीमध्ये माझे आजोबा आणि घरातील इतर लोकंही काम करायचे. मात्र आता फक्त आठवणी राहिल्या आहेत.